मुंबई- आमिर खान अभिनित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित दंगल हा कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या फोगाट फॅमिलीवर आधारित बायोपिक होता. यामध्या गीता आणि बबिता फोगाट या बहिणींच्या भूमिकांसाठी अनुक्रमे फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या नवोदित अभिनेत्रींची निवड झाली होती जी त्यांनी सार्थ ठरवली. यातील सान्या मल्होत्रा चोखंदळ राहिली आणि नंतर ती वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून दिसली. सान्या मल्होत्रा नंतर आयुष्मान खुराना सोबत बधाई दो या सुपरहिट चित्रपटातून झळकली. ती नवाझुद्दिन सिद्दीकी सोबत फोटोग्राफ या आर्ट फिल्ममध्ये दिसली. तसेच राधिका मदन सोबत एक अनोखा चित्रपट पटाखा मधून तिने काम केले. तसेच शकुंतला देवी, ल्युडो, मीनाक्षी सुंदरेश्वन सारख्या चित्रपटांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या. आता ती कठल नावाच्या वेब फिल्ममध्ये शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. त्या चित्रपटाच्या निमित्ताने सान्या मल्होत्राने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम बरोबर गप्पा मारल्या.
तुझ्या चित्रपटाचे नाव अगदी अनोखे आहे. कठल बद्दल काय सांगशील? -कठल म्हणजे फणस. कठलचे कथानक फणस या विषयाभोवती फिरते. अर्थातच या चित्रपटाचे शीर्षक अनोखे आणि लक्षवेधी आहे. एका गावात एक राजकीय नेत्याच्या अंगणातून दोन फणस चोरीला जातात आणि ते शोधण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते. तेथील पोलीस स्टेशनची मी प्रमुख असून माझ्या देखरेखीखाली तपास सुरू असतो. महत्त्वाचं म्हणजे ह्याची कथा सत्य घटनेवरून बांधली गेली आहे. आणि फणस चोरीला जाणे आणि त्यांचा तपास पोलिसांमार्फत होणे हे प्रत्यक्षात घडले आहे.
खरंतर निर्माती गुनित मोंगा, जिने द एलिफंट व्हिस्परर्स साठी ऑस्कर पटकावले, हिचा मला फोन आला होता. आम्ही पगलैटमध्ये एकत्र निर्माती-अभिनेत्री म्हणून एकत्र आलो होतो आणि आमचे सुर उत्तम जुळले होते. तिला आणि सर्व युनिटला माझे काम खूप आवडले होते. असो. तर गुनित ने मला सांगितले की तिच्या जवळ एक सुंदर वन लाईन आहे आणि तिला मला ती ऐकावयाची आहे. आम्ही झूम कॉल वर बोललो आणि ती आयडिया ऐकल्यावर मी तर तिच्या प्रेमातच पडले. नंतर मी दिग्दर्शक यशोवर्धन मिश्रा यांना भेटले. त्यांनी मला कथा सांगितली आणि मला समजले की मला या प्रकल्पाचा भाग व्हायचेच आहे. यशो आणि त्याचे वडील अशोक मिश्रा यांनी सुंदर पटकथा लिहिली आहे.
नजीकच्या काळात तुझे अनेक चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झालेत. त्याचा तुझ्या करियरला फायदा झाला की तोटा? -नक्कीच फायदा. खरं म्हणजे मला लॉकडाऊन फळला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोना कालखंडात चित्रपटगृहे बंद असल्याकारणाने अनेक सिनेमे ओटीटी वर प्रदर्शित करण्यात आले. माझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर प्रेक्षकांचा आणि फिल्म इंडस्ट्री मधील लोकांचा माझ्याकडे, एक अभिनेत्री म्हणून, बघण्याचा दृष्टीकोन बदलला. घरबसल्या अनेकांना माझ्यातील अभिनयक्षमतेबद्दल कल्पना आली. त्यामुळे मला चांगले रोल्स ऑफर होताहेत. मीनाक्षी सुंदरेश्वर, लव्ह हॉस्टेल, लुडो हे चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झाले. परंतु पगलैट नंतर बदल प्रकर्षाने जाणवू लागला. मी तो बदल अनुभवला आहे आणि त्याचे श्रेय ओटीटीला नक्कीच जाते. दंगल पासूनच अभिनयावर मी खूप मेहनत घेत आले आहे आणि तेथूनच माझी अभिनेत्री म्हणून कंडिशनिंग सुरू झाली होती. आतापर्यंतचा प्रवास नक्कीच चांगला आहे.