मुंबई - आपल्या खास स्टाईलने व्यक्तिरेखांमध्ये छाप सोडणाऱ्या संजय मिश्रा यांच्या आगामी 'वो 3 दिन' या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाचे पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत चित्रपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे.
या चित्रपटात संजय मिश्रासोबत एमएस धोनी या चित्रपटात दिसलेले राजेश शर्मा आणि कमिने, फालतू आणि जबरिया जोडी या चित्रपटात दिसलेले चंदन राय सन्याल हे मुख्य भूमिकेत आहेत. पोस्टरबद्दल बोलायचे झाले तर तिन्ही कलाकार रेल्वे रुळावर बसलेले आहेत. संजय देसी स्टाईलमध्ये गमचा आणि पायजमा घातलेला दिसत आहे तर राजेश शर्ट-पॅन्टमध्ये आणि चंदन सूट-बूट घातलेला दिसत आहे.
यापूर्वी संजय मिश्राने पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'काही दिवसांनंतर.. 'वो तीन दिन', लॉकडाऊननंतर पूर्ण झालेला आमचा पहिला चित्रपट!' यासोबतच चित्रपटाशी संबंधित कलाकारांनाही टॅग करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शन राजू आशु यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती पंचम सिंग यांची आहे.