मुंबई- ख्यातनाम निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आगामी म्यूझिकल 'बैजू बावरा' चित्रपटची निर्मिती करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यात रणवीर सिंग मुख्य नायकाची भूमिका करणार असल्याचं अगोदर स्पष्ट करण्यात आलं होतं. या चित्रपटाच्या नायिकेचा शोध काही काळापासून सुरू होता आणि आता अभिनेत्री नयनताराच्या नावापर्यंत तो शोध पोहोचला आहे. 'बैजू बावरा'च्या कलाकारांमध्ये नयनतारा सामील होणार असल्याची माहिती आहे.
साउथ सिनेमाची लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी नयनतारा अलीकडेच शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलं होतं. यात तिनं नर्मदा राय नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. पडद्यावरची तिची उपस्थिती प्रेक्षकांची भरपूर मनोरंजन करुन गेली. आता 'बैजू बावरा'मध्ये ती संजय लीला भन्साळीसोबत काम करणार असल्याच्या चर्चेनं मनोरंजन जगतात उत्साहाची लहर तयार झाली आहे.
'बैजू बावरा' या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात नयनतारा आलिया भट्टची जागा घेत नाही तर रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासोबत मुख्य भूमिकेसाठी तिचा विचार केला जात आहे. मात्र निर्मात्याकडून अद्याप याबातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कारण अद्याप नयनतारासोबत एग्रीमेंट अद्याप साईन झालेलं नाही.
नयनतारा आणि तिचा पती दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी मार्च 2023 मध्ये संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली होती. यादरम्यान या चित्रपटात नयनताराच्या सहभागी होण्याबद्दलची चर्चा झाली होती. सर्व काही सुरळीत पार पडले तर अभिनेत्री नयनतारा रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासोबत 'बैजू बावरा'च्या कलाकारांमध्ये सामील होऊ शकते.