मुंबई- अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू गेल्या काही महिन्यापासून मायोसिटिस या आजाराने त्रस्त आहे. यशोदा चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान या आजाराचे निदान झाले होते. विशेष म्हणजे उपचार सुरू असतानाच तिने या सिनेमाचे डबिंग पूर्ण केले होते. सध्या तिने कुशी या आगामी चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. कुशी रॅपअप झाल्यानंतर नुकतीच ती हैदराबादला परतलीय. विमानतळातून बाहेर येताना ती कुशीचा सहकलाकार विजय देवरकोंडासोबत दिसली.
कुशी हा चित्रपट करत असतानाच ती सिटाडेल या मालिकेच्या हिंदी रुपांतरातही काम करत होती. या दोन्ही प्रोजेक्टचे काम पूर्ण केल्यानंतर तिने आता आपल्या आरोग्यासाठी वेळ काढण्याचे निश्चित केले आहे. अलिकडच्या काळात ती सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसून आली नव्हती. तिने आपला संपूर्ण वेळ हातात असलेले प्रोजेक्ट संपवण्यावर भर दिला होता.
विमानतळावरील फोटोग्राफर्सनी घेतलेल्या व्हिडिओंमध्ये, सामंथा आणि तिची टीम कारच्या दिशेन जाताना दिसली. यावेळी फोटोग्राफर्सनी तिला फोटोसाठी पोझ देण्याची विनंती केली, मात्र तिने नकार दिला. सामंथा विमानतळावर आरामशीर पोशाख परिधान केलेली दिसली. तिने काळ्या रंगाचे जाकीट, काळी टोपी, पांढरा टी-शर्ट आणि निळी पँट घातलेली होती.
सिटाडेल या वेब सिरीजचे भारतीय रूपांतर पूर्ण केल्यानंतर सामंथा किमान एक वर्षासाठी अभिनयातून विश्रांती घेणार आहे. तिच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तिने ही सुट्टी घेण्याचा ठरवलंय कारण तिला तिच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे आहे आणि मायोसिटिस थेरपीसाठी यूएसला जाण्याची तिची योजना आहे. सामंथाने काही महिन्यांपूर्वी अभिनयातून सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला होता.पुढील एका वर्षाच्या ब्रेकच्या काळात सामंथाने सध्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टवर सही केलेली नाही.