मुंबई- Sam Bahadur X reviews: डिसेंबर महिन्याची सुरुवात बॉक्स ऑफिसवरील रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या चित्रपटाच्या संघर्षानं झाली. दोघांचे अनुक्रमे 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' हे चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाले. विकी कौशल अभिनीत सॅम बहादूर हा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक युद्धपट आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
नेटिझन्सनं हा चित्रपट आवडल्याचं दिसतंय. चित्रपट 1 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहात दाखल होताच, चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. विकी कौशलनं साकारलेला सॅम माणेकशॉ प्रेक्षकांनी स्वीकारल्याचं दिसत आहे. मात्र काहींनी मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाला नावंही ठेवली आहेत. येथे काही X रिव्ह्यू देत आहोत.
रिलीजपूर्वी निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपली मते मांडली आहेत. 'जरा हटके जरा बचके' मधील विकी कौशलची सहकलाकार सारा अली खानने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटातील विकीचा लूक पोस्टर शेअर केला आणि 'सॅम बहादूर'च्या टीमचं कौतुक करत एक लांबलचक चिठ्ठीही लिहिली आहे.
चित्रपट निर्माता करण जोहरनं विकी कौशलच्या सॅम बहादूरच्या उत्कृष्ट व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकत चित्रपटाबद्दल आपले विचार मांडले आहेत. त्यांनी रॉनी आणि RSVP Movies च्या टीममधील सहकाऱ्यांचं उत्कष्ट निर्मितीबद्दल कौतुक केलं आहे. या चित्रपटासाठी केलेल्या संशोधनाची तारीफ करणनं केली आहे.