मुंबई - Salman Khans birthday : बुधवारी 27 डिसेंबर रोजी सलमान खान आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी सलमानचे चाहते गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते. मंगळवारी रात्रीपासूनच मुंबई आणि शहराबाहेरील चाहत्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांच्या हातात पुष्पगुच्छांसह भेटवस्तुही होत्या. चाहत्यांच्या हातामध्ये मोठे पोस्टर्स आणि बॅनरही दिसत होते.
सलमानच्या वाढदिवसानिमित्त खान कुटुंबीयांनी अर्पिता खान शर्माच्या मुंबईतील घरी खास पार्टीचे आयोजन केले होते. याच दिवशी सलमानची भाची आयतचाही वाढदिवस आहे. मामा भाचीने मिळून यंदाचा खास वाढदिवस साजरा केला. या दोघांनी मिळून कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त केक कापला. सलमान खानच्या मध्यरात्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक दाखवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. व्हिडिओंमध्ये, नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत असलेल्या 'दबंग' सलमानने निळ्या जीन्ससह काळा शर्ट घातला होता.
वडील आयुष शर्मा आणि आई अर्पिता खान यांच्यासोबत आयतचा मोठा केक कापताना सलमान खान त्याच्या भाचीसाठी वाढदिवसाचे गाणे गाताना दिसला. या पार्टीमध्ये लुलिया वंतूर, अरबाज खान, अरबाज खानचा मुलगा अरहान खान, सोहेल खान, हेलन, अलविरा खान अग्निहोत्री, आयुष शर्मा, अर्पिता खान शर्मा, बॉबी देओल आणि इतर उपस्थित होते.