मुंबई - Tiger 3 enters 100 crore club : सुपरस्टार सलमान खानच्या 'टायगर 3' ची क्रेझ वाढतच चालली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं अवघ्या दोन दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 58 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे केवळ 2 दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 101 कोटीवर पोहोचलंय.
व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्रामवर याबद्दल पोस्ट सेअर करुन लिहिलं, "टायगरने 2 दिवसांत शतक ठोकलं... टायगर 3 नं दुसऱ्या दिवशी पार्कच्या बाहेर चेंडू भिरकावला ... 2 दिवसात १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. 2 दिवसात म्हणजेच 48 तासांत शतक ठोकणारा हा २०२३ मधील तिसरा हिंदी चित्रपट ठरला. यापूर्वी जानेवारीत पठाण, सप्टेंबरमध्ये जवान आणि आता हा तिसरा टायगर 3 ने ही कामगिरी केली आहे.
मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे आणि यशराज फिल्म्सच्या वॉर आणि पठाण सारख्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. विशेष म्हणजे टायगर 3 मध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशनचे पोस्ट-क्रेडिट कॅमिओ सीन देखील आहेत.
2019 च्या 'भारत' चित्रपटानंतर 'टायगर 3' हा सलमान खानसाठी 42.30 कोटींची कमाई करणारा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन मागील चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट RA&W एजंट टायगर (सलमान) आणि ISI एजंट झोया (कतरिना कैफ) यांचा समावेश असलेल्या नवीन खतरनाक मोहिमेवर केंद्रित आहे. 2012 मध्ये आलेल्या 'एक था टायगर'चा पहिला भाग कबीर खाननं दिग्दर्शित केला होता. त्यानंतर 2017 मध्ये 'टायगर जिंदा है'या चित्रपटासह टायगर फ्रँचायझीचा विस्तार झाला. दुसरा भाग अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला होता.