मुंबई : Maldives Lakshadweep : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यांनी तेथील सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पंतप्रधान मोदींच्या या भेटीनंतर लक्षद्वीप सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. मात्र मालदीवच्या काही मंत्र्यांना ही गोष्ट आवडली नाही. यानंतर मालदीव सरकारमधील अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णभेदाच्या कमेंट्स केल्या. मात्र असं करणं आता त्यांना महागात पडलंय.
मालदीव आणि लक्षद्वीप प्रकरण : अक्षय कुमार, सलमान खानसह भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या विरोधात पुढे आले आणि त्यांनी चाहत्यांना देशातील सुंदर ठिकाणांना भेट देण्याचं आवाहन केलंय. या प्रकरणावरून अक्षय कुमारनं संताप व्यक्त करत, त्याच्या 'X' अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. "मालदीवच्या प्रमुख व्यक्तींनी भारतीयांविरोधात द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी कमेंट्स केल्या आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ज्या देशातून सर्वाधिक पर्यटक त्यांच्या देशात येतात, त्या देशासोबतच ते असं करत आहेत. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगलं वागतो. मात्र आपण असा विनाकारण द्वेष का सहन करावा? मी मालदीवला अनेकदा भेट दिली आहे आणि त्यांचं नेहमीच कौतुक केलंय. तुम्ही भारतीय बेटांना भेट द्या आणि पर्यटनाला पाठिंबा द्या", असं अक्षय कुमार म्हणाला.