मुंबई- प्रशांत नील दिग्दर्शित प्रभास स्टारर बहुप्रतिक्षित 'सालार' चित्रपट अखेर शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला. जगभरातील प्रभासच्या चाहत्यांनी अतिशय उत्साहानं 'सालार'चं स्वागत केलं. चित्रपटगृहांबाहेर झालेल्या सेलेब्रिशनचे व्हिडिओ आणि सामान्य लोकांच्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रियांनी X हँडल भरुन गेलं आहे.
चित्रपटाबद्दल तयार झालेल्या सकारात्मक पार्श्वभूमीमुळे 'सालार' येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा आहे. हैद्राबादमधील थिएटरमध्ये 'सालार' सुरू होण्यापूर्वी, एका चाहत्याने प्रेक्षक आनंदात नाचतानाचे रेकॉर्डिंग पोस्ट केलं आहे. या व्हायरल व्हिडिओंमध्ये, लोक खूप छान वेळ घालवताना, फटाके लावताना आणि प्रभासच्या प्रचंड 'सालार' कटआउट्ससोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत.
'सालार: भाग 1 - सीझफायर' हा प्रशांत नीलचा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम या भारतातील पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या पॅन इंडिया चित्रपटात श्रृती हासन नायिकेच्या भूमिकेत आहे, तर प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. मीनाक्षी चौधरी, सरन शक्ती, जगपती बाबू, टिन्नू आनंद, श्रेय भार्गव यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दोन तास पंचावन्न मिनिटे चालणाऱ्या 'सालार'ला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ सर्टिफिकेट मिळालं आहे. संपूर्ण चित्रपटात अनेक हिंसक, क्रूर लढाऊ दृश्ये आणि युद्धाची दृश्ये आहेत. चित्रपटाबद्दल बोलताना, एका सोशल मीडिया युजरने 'सालार'ला प्रभासचा 'बाहुबली' नंतरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचं म्हटलंय.