मुंबई - Salaar Movie : गेल्या अनेक दिवसांपासून प्रभासच्या चाहत्यांच्या मनात 'सालार' चित्रपटाविषयी खूप उत्सुकता लागली होती. अनेकजण हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही या संभ्रमात होते. पण आता निर्मात्यांनीच अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली आहे. निर्मात्यांच्या मते, प्रभास स्टारर 'सालार' चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज होणार नाही. तसंच या चित्रपटाची नवीन रिलीज डेटही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'सालार' रिलीजची तारीख पुढं ढकलल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रभास यांनी याबाबत मौन बाळगलं होतं.
'सालार' संबंधित अपटेड : 'आदिपुरुष' चित्रपटाच्या अपयशानंतर प्रभासचे चाहते 'सालार'ची वाट पाहात आहेत. 'केजीएफ' फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या चित्रपटाबाबत, चाहत्यांना अपेक्षा होती की हा चित्रपट प्रभासला वेगळ्या शैलीत सादर करेल आणि पुन्हा एकदा प्रभासला त्याची पूर्वीची जागा मिळेल. यामुळेच चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर लोक लक्ष ठेवून आहेत. 'सालार'चा टीझर हा प्रेक्षकांनी खूप पसंत केला. मात्र त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाविषयी कुठलीही अपडेट दिली नाही. 28 सप्टेंबर ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती.