मुंबई- Salaar box office collection day 1 prediction : 'सालार : भाग 1 -सीझफायर' चित्रपटानं प्रभासच्या चाहत्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण केलं आहे. या बहुप्रतिक्षित रिलीजचं प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केलंय. 'आदिपुरुष'ला मिळालेल्या अपयशानंतर प्रभासने प्रशांत नील दिग्दर्शित चित्रपटातून पुनरागमनाचा प्रयत्न केला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कचे सुरुवातीचे अंदाज बॉक्स ऑफिसवर तडाखेबंद कलेक्शनचे आकडे दर्शवतात. 'सालार'चे भारतातील पहिल्या दिवसाचे कलेक्शन अंदाजे 95 कोटी असेल असा आडाखा बांधला जातोय.
'सालार' चित्रपटाची निर्मिती गेल्या दोन वर्षापासून सुरू होती. होंबाळे फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट प्रभासचे पुनरागमन असल्याचं मानलं जात होतं. त्यामुळे त्याचे चाहते रिलीजची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. राष्ट्रीय सिने साखळीचा मर्यादित पाठिंबा असूनही चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग जबरदस्त झालं आहे. चित्रपटानं केवळ भारतातच ऑनलाइन बुकिंगमधून 42 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही विक्रीचा विचार करता, 'सालार' ची एकूण ओपनिंग डे कमाई सर्व भाषांसह एकूण 100 कोटी ओलांडण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलुगू भाषिक राज्यातून 70 कोटी रुपयांच्या आसपासचे महत्त्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे. चित्रपटाच्या एकूण यशासाठी हिंदी मार्केट महत्त्वपूर्ण आहे आणि सुरुवातीच्या बुकिंग ट्रेंड अंदाजे 20 कोटी रुपयांच्या अपेक्षित कमाईचा आकडा दाखवत आहे.