मुंबई - Zimma 2 teaser released : जेव्हा चित्रपटसृष्टी कोरोनाच्या विळख्यात सापडली होती आणि मराठी सिनेमाचं भविष्य अंधारमय दिसत होतं तेव्हा अडीचएक वर्षांपूर्वी 'झिम्मा'ची आशादायक झुळूक आली आणि मराठी चित्रपटसृष्टीला हुरूप देऊन गेली. झिम्मानं बॉक्स ऑफिसवर उत्तम धंदा केला. अर्थात त्याची संहिता आणि सर्वच कलाकारांचे सहजसुंदर अभिनय यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतला. मराठी चित्रपट सृष्टीमधील मरगळ झटकण्यास हा चित्रपट कारणीभूत ठरला. आता त्याचा सिक्वेल येऊ घातलाय. झिम्मा २ चा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून त्यावरून तो मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट असेल हे जाणवतंय. ‘झिम्मा२’ दिवाळीनंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.
पहिल्या भागातील सात जणींच्या सात तऱ्हा प्रेक्षकांना पुन्हा एकदा मजेदारपणे अनुभवायला मिळणार आहे. या फीमेल गॅंगचं रियुनियन होणार असून त्यांच्या गमतीदार गोष्टी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. सिद्धार्थ चांदेकरनं सांगितलेच आहे की, 'यावेळेला खूपच व्हरायटी आहे. झिम्माच्या गर्ल गॅंगमध्ये अजून दोघींची एन्ट्री झाली असून त्यामुळे मनोरंजनाचा स्तर अधिकच उंचावलेला दिसणार आहे. यावेळी किती रंगांचे इंद्रधनुष्य बघायला मिळेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पहिल्या भागातील नवीन मैत्री आता अजूनही बहारदार झालेली दिसेल.
सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव या पहिल्या झिम्मातील मैत्रिणींच्या ताफ्यात रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे यांचा समावेश झालेला आहे. त्यांच्यासोबत हँडसम सिद्धार्थ चांदेकर आहेच. 'झिम्मा २' चे दिग्दर्शन हेमंत ढोमे करीत असून हा सिनेमा निखळ मनोरंजन देत खास करून महिलांना आयुष्य नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा आहे. याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात की, ' 'झिम्मा' सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडला. अनेक अवॉर्ड्स मिळाले. या सिनेमाने अनेक महिलांना स्वतःसाठीसुद्धा आयुष्य जगण्याचा मंत्र दिला. प्रवासात मैत्री बनते, कदाचित त्या मित्रांची पुढे कधीही भेट होत नाही, परंतु ती कायमची लक्षात राहते. कदाचित मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात. याच कल्पनेवर आधारित ही झिम्मा ची ‘रियुनियन’ असून सर्वांना आवडेल अशी आहे.'
जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित 'झिम्मा २' येत्या २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.