मुंबई- आरआरआर चित्रपटतील नाटू नाटू गाण्याला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार प्राप्त करताना, संगीतकार एमएम कीरवाणी खूप आनंदी दिसले कारण त्यांच्या या गाण्याच्या निर्मितीने लाखो लोकांना आनंद दिला आहे आणि 2023 मध्ये ऑस्कर पुरस्कारावर मोहोर उमटवून जगभर ख्याती मिळवली आहे. यावेळी बोलताना कीरवाणी म्हणाले की या गाण्याने ऑस्कर जिंकून त्यांना जगाच्या शिखरावर आणले आहे. त्यांनी आपल्या भाषणात दिग्दर्शक एसएस राजामौली आणि आरआरआर फॅमिलीचे आभार मानले.
कीरवाणी यांचे भाषण म्हणजेही एक गाणेच होते. अत्यंत भावूक होऊन नम्रपणे त्यांनी अकादमीचे आभार मानले. ते म्हणाले, 'धन्यवाद अकादमी. मी द कारपेंटर्स ऐकत मोठा झालो... आणि येथे मी ऑस्करमध्ये आहे. माझ्या मनात एकच इच्छा होती... राजामौली आणि माझ्या कुटुंबाचीही तीच होती... आरआरआर, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. धन्यवाद.' नाटू नाटू गाण्याने 95 व्या ऑस्करमध्ये भारताला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याच्या श्रेणीतील पहिला पुरस्कार मिळवून देत इतिहास रचला आहे. ऑस्करपूर्वी, आरआरआर चित्रपटातील या गाण्याने गोल्डन ग्लोब आणि क्रिटिक चॉईस अवॉर्ड जिंकला होता. हे गाणे काळभैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी स्वरबद्ध केले आहे आणि आरआरआर लीडिंग मॅन ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यावर चित्रित केले आहे. या गाण्याला प्रेम रक्षित यांनी कोरिओग्राफ केली होती व अत्यंत उत्साही नृत्याच्या क्रेझला न्याय दिला होता.