मुंबई - दिग्दर्शक करण जोहरचा बहुप्रतीक्षित रॉकी और रानी की प्रेम कहानीचा ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला एनर्जीटिक ट्रेलर युवा प्रेक्षकांना डोळ्यासमोर बनवल्याचे दिसत आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या जोडी व्यतिरिक्त, चित्रपटात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट २८ जुलै रोजी रिलीज होणार आहे.
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा एक आनंददायी कौटुंबिक चित्रपटासारखा दिसतो. भव्य सेट्स, मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि दिलखेचक संवाद यासह करण जोहरचा दिग्दर्शकिय टच याला मिळाला आहे. मुख्य कलाकार रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्यातील रुसवा फुगवा, रोमान्स, सण आणि लग्नाच्या वेळी कौटुंबिक उत्सवाचा आनंद लुटतानाची अनेक दृश्ये नेत्रदिपक आहेत.
धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत चॅनेल अंतर्गत यूट्यूबवर ट्रेलर टाकण्यात आला होता. करण जोहर फिल्म इंडस्ट्रीमध्ये २५ वर्षे पूर्ण करत असताना या चित्रपटासह तो दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. यासाठी एक रोमँटिक कथा त्याने निवडली आणि एता भव्य स्वरुपात ते पडद्यावर मांडण्यासाठी तो सर्व शक्तीनिशी सज्ज झाल्याचे ट्रेलरवरुन दिसत आहे. २०२३ चा हा सर्वात मोठी मनोरंजक चित्रपट ठरणार असल्याचा दावा धर्मा प्रॉडक्शनच्यावतीने करण्यात येत आहे. २८ जुलै रोजी रॉकी और रानी की प्रेम कहानी देशभर रिलीज होणार आहे.
करण जोहरच्या चित्रपटांची सर्व वैशिष्ट्य असलेले सौंदर्य आणि भव्यता ३ मिनिट, २१ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत. ट्रेलरमध्ये आघाडीचे जोडपे आलिया आणि रणवीर यांना एकमेकांपासून वेगळे दाखवण्यात आले होते. मतभेदांवर मात करण्यासाठी आणि एकमेकांच्या कुटुंबात मिसळण्यासाठी, जोडपे कुटुंब बदलण्याचा निर्णय घेतात. पण, सांस्कृतिक फरकातून त्यांचे प्रेम टिकेल का, हा खरा प्रश्न आहे. करण जोहर सहा वर्षांनंतर रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून दिग्दर्शकाच्या खुर्चीवर परतला आहे.