मुंबई - 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली कामगिरी चोख बजावली आहे. या चित्रपटाला भारतात आणि परदेशात उत्तम प्रतिसाद मिळत असून २ ऑठवड्यानंतरही प्रेक्षक थिएटरच्या दिशेने येत आहेत. करण जोहरसाठी एक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ही खूप मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. या चित्रपटाने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर २५० कोटींचा गल्ला जमवला आहे. नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीवरुन करणने ही माहिती दिली.
प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रेम आणि प्रतिसादाबद्दल करणने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. कौटुंबिक मनोरंजन असणारा चित्रपट सुसाट धावत असल्याचे सांगत ग्लोबल बॉक्स ऑफिसवर तब्बल २५० कोटीचा आकडा पार केला असल्याचेही करण जोहरने इन्स्टा स्टोरीवर लिहिले आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात १२० कोटींची कमाई केली असून बाकीचे उत्पन्न परदेशातील कमाईमुळे झाले आहे.
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाला शुक्रवारी १५ दिवस पूर्ण झाले. आता या चित्रपटाची मोठी टक्कर 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' शी सुरू झाली आहे. या दोन्ही फ्रँचाइजच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. करण जोहरचा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा चित्रपटासमोर मोठ्या चित्रपटाची टक्कर नव्हती. याचा त्याला लाभही मिळाला आणि दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश केला. आता मात्र बॉक्स ऑफिसवर तगडा मुकाबला असल्यामुळे रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे टेन्शन वाढू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात करण जोहरच्या चित्रपटाचा करिष्मा कसा राहणार यावर बरेच काही अवलंबून आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून करण जोहरने बऱ्याच काळानंतर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले. त्याच्या धर्मा प्रॉडक्शनला शोभेल असा चित्रपट बनवण्याचे त्याच्या समोर आव्हान होते. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता हे आव्हान त्याने पेलले असल्याचे दिसते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वत्र मिळणारा प्रतिसाद पाहून त्याने अंदाज बांधला होता की चित्रपट सहज १०० कोटी क्लबमध्ये जाईल. १० व्या दिवशी हा आकडा त्याने पार केला. रिलीजनंतर त्याने सर्व कलाकार व क्रूसाठी एक भव्य पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये रणवीर सिंगसह दीपिका पदुकोणनेही हजेरी लावली होती. धर्मा प्रॉडक्शन फॅमिली सध्या मिळत असलेल्या यशावर खूश आहे.