मुंबई Riteish Deshmukh Poll :देशात गेल्या काही दिवसांपासून एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे देशाचं नाव 'इंडिया' की 'भारत'! जी २० डिनरच्या निमंत्रणात राष्ट्रपतींनी नेहमीच्या 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख केल्यानंतर हा वाद सुरू झाला. या वादावर अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, वीरेंद्र सेहवाग अशा अनेक सेलिब्रेटींनी आपली मतं व्यक्त केली आहेत. आता बॉलीवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनंही या वादात उडी घेतली.
रितेश देशमुखनं सोशल मीडियावर पोल घेतला : रितेश देशमुखनं नुकताच 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोल घेतला. या पोलमध्ये त्यानं देशाचं नाव काय असावं, तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला त्यानं पुढील चार पर्याय दिले. १) भारत २) इंडिया ३) हिंदूस्थान ४) सगळे सारखेच आहेत. रितेशच्या या पोलला ५७,००० पेक्षा जास्त युझर्सनं वोट दिलं. त्या पोलचा निकाल आता समोर आला आहे.
पोलचा निकाल : वोट दिलेल्या ५७,०४९ लोकांपैकी २९.३ टक्के लोकांनी 'भारत' नावाला पसंती दिली. तर २३.६ टक्के लोकांनी 'इंडिया'ला वोट केलं. तसंच 'हिंदूस्थान' या पर्यायाला फक्त ४.२ टक्के लोकांनी मत दिलं. तब्बल ४२.९ टक्के लोकांनी 'सगळे सारखेच आहेत' या पर्यायाला पसंती दिली.
जॅकी श्रॉफनही भूमिका मांडली : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफनही या वादावर आपली भूमिका मांडली होती. 'पूर्वी आपल्या देशाला भारत म्हटलं जायचं. माझं नाव 'जॅकी' आहे. मात्र काही जण मला 'जॉकी', तर काही मला 'जकी' म्हणतात. लोकांनी माझं नाव बदललं म्हणून मी बदलणार नाही. तुम्ही देशाचं नाव बदलत राहता, मात्र तुम्ही 'इंडियन' आहात हे विसरू नका', असं जॅकी श्रॉफ म्हणाला होता.
हेही वाचा :
- Jackie Shroff : 'इंडिया' विरुद्ध 'भारत' वादावर अभिनेता जॅकी श्रॉफची सूचक प्रतिक्रिया, म्हणाला...
- Bharat Name History : ऋग्वेदापासून संविधानापर्यंत, असा आहे 'भारत'चा प्रवास; जाणून घ्या
- Demand Of Team Bharat : खेळाडूंच्या जर्सीवर 'टीम इंडिया'ऐवजी 'टीम भारत' लिहिण्याची वीरेंद्र सेहवागची मागणी