मुंबई - आपल्या रांगड्या अभिनयाने संपूर्ण देशातील सिनेप्रेमींना आकर्षित करणारा अभिनेता ऋषभ शेट्टी हा नव्या पुरस्कारामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज झालेला 'कंतारा' हा चित्रपट ऋषभला चांगलाच यशदायी ठरला होता. कंतारामुळे कर्नाटकपुरता मर्यादित असलेला हा अभिनेता आता अखंड भारताच्या पातळीवर पोहोचला आहे. भारतातील इतर व परभाषिक समुदायाकडून खूप कौतुक आणि मान्यता मिळालेल्या ऋषभला आता आणखी एक सन्मान प्राप्त झाला आहे.
दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'कंतारा'च्या यशानंतर अभिनेता ऋषभची मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर कॅटेगरीत घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२३ चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मिश्रा यांनी एका पत्राद्वारे याची घोषणा केली आहे.
हा दादासाहेब फाळके पुरस्कार केंद्राचा नाही- २० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईतील ताज लँड अँड हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार असून त्यात हा पुरस्कार विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सिनेक्षेत्रातील व्यावसायिक आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार एकूण 28 श्रेणींमध्ये दिला जातो. तसे, दादासाहेब फाळके अवॉर्ड फाउंडेशन या पुरस्काराचे वितरण करणार असून हा केंद्र सरकारचा पुरस्कार नाही. केंद्र सरकारच्या वतीने सिनेक्षेत्रात अतुनीय कामगिरी केलेल्या दिग्गज व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार म्हणून बहाल केला जातो. भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार हाच सर्वोच्च आहे, त्यामुळे लोकांच्या मनात गोंधळ होऊ नये म्हणून हा खुलासा.