मुंबई - kantara : होंबळे फिल्म्स भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम प्रॉडक्शन हाऊसपैकी एक आहे. या प्रॉडक्शन हाऊसनं प्रेक्षकांना 'केजीएफ चॅप्टर 2' आणि 'कांतारा' असे दोन मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 'कांतारा' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. या चित्रपटाची कहाणी वेगळी असल्यानं या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.'कांतारा' हा चित्रपट एक दिव्य अनुभव देणारा आहे. ऋषभ शेट्टीनं 'कांतारा'चं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटात त्यानं अभिनय देखील केला आहे. 'कांतारा' चित्रपटामधील संगीत हे उत्कृष्ट होते. या चित्रपटानं अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.
सिल्व्हर पीकॉक अवॉर्ड : 'कांतारा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होऊन वर्षभराहून अधिक काळ लोटला असला तरी, या चित्रपटाविषयीचं प्रेम आता देखील पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला नुकताच 'सिल्व्हर पीकॉक अवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे. गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला, जिथे 'कांतारा'नं भारतीय चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. या चित्रपटानं महोत्सवात सिल्व्हर पीकॉक पुरस्कार जिंकल्यानंतर निर्मात्यांनी ही बातमी शेअर करताना लिहिलं, 'कांतारा'नं इफ्फी गोवा येथे पहिला सिल्व्हर पीकॉक अवॉर्ड जिंकून कन्नड सिनेमाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे'.