मुंबई - रिंगण या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या मकरंद माने यांच्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट (मराठी) हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच १४ व्या स्टुटगाट फिल्म फेस्टीवल मध्ये रिंगण ला डायरेक्टर्स व्हिजन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. तसेच हा चित्रपट १९ व्या इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फिल्म फेस्टीवल मध्ये ऑफिशियल एंट्री म्हणून गेला होता. मकरंद माने यांचा दुसरा चित्रपट म्हणजे यंग्राड. त्यानंतर त्यांनी सैराट फेम रिंकू राजगुरूला घेऊन कागर बनविला. या दोन्ही चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता नॅशनल अवॉर्ड विनर मकरंद माने दिग्दर्शित खिल्लार नावाचा चित्रपट येत आहे. 'खिल्लार' चे आकर्षण म्हणजे रिंकू राजगुरू, ललित प्रभाकर आणि बैलगाडा शर्यत.
खिल्लार चित्रपटात शर्यतीचा थरार- बैलगाडा शर्यतीबद्दल बोलायचे झाले तर याभोवती राजकारण्यांच्या खेळी रंगतात. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतीचा जल्लोष वेगळाच रंग दर्शवितो. सामाजिकदृष्ट्या बैलगाडा शर्यतीला मान आहे. कोर्टाच्या आदेशामुळे या शर्यतीवर मळभ आलं होतं परंतु यामागील परंपरा आणि भावना यांचा विचार करीत बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील मिळाला. 'खिल्लार' या चित्रपटात या शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. अर्थात सैराट ची आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ची यात आकर्षक भूमिका असून तीसुद्धा 'खिल्लार' चे आकर्षण ठरेल. आणि तिच्या सोबतीला मराठीतील हँडसम हंक ललित प्रभाकर आहे. या नवीन जोडीची केमिस्ट्री सुद्धा चित्रपटाचा आकर्षण बिंदू ठरेल अशी आशा दिग्दर्शकाने व्यक्त केली आहे. रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर यांच्या साथीने चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दर्शविले जाणार असल्यामुळे 'खिल्लार' वेगळ्या उंचीवर जाईल असाही विश्वास दिग्दर्शकाने व्यक्त केला आहे.