मुंबई - Renuka Shahane Birthday: 'हम आपके है कौन' फेम रेणुका शहाणेचा आज वाढदिवस आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानची वहिनी बनून तिनं खूप प्रसिद्धी मिळवली होती. रेणुका आज आपला 57वा वाढदिवस साजरा करतेय. तिनं मराठी चित्रपटांमध्येही आपली प्रतिभा दाखवली असून छोट्या पडद्यावरही काम केलं आहे. रेणुकाचा जन्म 7 मार्च 1966 रोजी मुंबईत झाला. तिनं मिठीबाई कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. रेणुकानं 1989 मध्ये दूरदर्शनवरील 'सर्कस' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेत तिच्याबरोबर तेव्हा नवोदित कलाकार असलेला बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानदेखील होता. या शोमध्ये तिनं आपल्या गोंडस हास्यानं लोकांची मनं जिंकली.
'हम आपके है कौन' मधून प्रसिद्धी मिळाली :रेणुकानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी, तिला खरी ओळख सलमान खान आणि माधुरी दीक्षित स्टारर 'हम आपके है कौन' या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. या चित्रपटात तिनं सलमानच्या वहिनीची भूमिका साकारली होती, जी अनेकजणांना भावली. या चित्रपटामध्ये तिनं एका आदर्श सूनेची व्यक्तिरेखा साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. हा चित्रपट रेणुकासाठी खूप खास ठरला. तिनं आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. साईड रोल करून तिनं खूप नाव कमावलं. रेणुकानं 'मनी मनी', 'मासूम', 'एक अलग मौसम', 'दिल ने जिस अपना कहा', 'हायवे' यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिनं तमिळ आणि मराठी चित्रपटांतही काम केलं आहे.