मुंबई - title track Bajind release : आपल्याकडं चित्रपटांमध्ये संगीत आणि गाणी यांना खूप महत्व दिलं जातं. बऱ्याचदा गाण्यांतून कथानकाला गती देण्याचे काम होतं आणि चित्रपटाचा मूड सेट करता येतो. त्याचप्रमाणे प्रेम व्यक्त करण्यासाठीदेखील रोमँटिक गाण्यांचा आधार घेतला जातो. आजपर्यंत अनेक प्रेमगीतं पॉप्युलर झालेली आहेत आणि पुढेही होत राहतील. आगामी मराठी चित्रपट 'बाजिंद'मधील एक रोमँटिक गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आलंय. हे एक रोमँटिक टायटल साँग असून या शीर्षक गाण्यातून चित्रपटातील नायक नायिकेची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
'बाजिंद'मध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता हंसराज जगताप याची जोडी जमली आहे पूजा बिरारी या अभिनेत्री सोबत. या नव्या कोऱ्या जोडीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे रोमँटिक गाण्यात अधिकच रंगत भरली गेली आहे. 'हातामध्ये हात तुझा, शहारलं अंग, इंद्रधनू नभामध्ये उधळतो रंग...' अशी सुरेख शब्दरचना असलेलं या शीर्षक गीतात त्यांनी इंद्रधनुष्याचे रंग उधळले आहेत आणि त्यामुळे ते गाणे बहुरंगी झालंय. त्यांनी अल्लड वयातील प्रेमाचा सारीपाट मांडणाऱ्या या गाण्यात कुठेही उथळपणा न करता गावातील प्रेमी युगूलाच्या प्रेमाचे गुलाबी रंग भरले आहेत. साधेपणा आणि संयम दर्शवित गावाकडच्या साध्याभोळ्या प्रेमाची झलक या गाण्यातून प्रतीत होते.
'बाजिंद' मधील 'हातामध्ये हात तुझा...' या गाण्याचे बोल लिहिले आहेत शहाजी पाटील यांनी आणि त्यांनीच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. निर्माते शिंदे-सरकार यांची कथा असून पटकथा, संवाद आणि गीतलेखन शहाजी पाटील यांचे आहे. या गाण्याचे संगीत ऍग्नल रोमन यांनी दिले असून प्राजक्ता शुक्रे यांच्या आवाजात स्वरबद्ध झाले आहे. हंसराज आणि पूजा यांच्या सोबत शर्वणी पिल्लई, सिद्धेश्वर झाडबुके, अनिल नगरकर, माधुरी पवार, उषा नाईक, प्रेमा किरण, ओंकार भोसले, प्रियंका राठोड आदी कलाकार या चित्रपटात कदम करीत आहेत. नंदकुमार शिंदे-सरकार आणि शहाजी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती शान फिल्म्स क्रिएशनची आहे. वेदिका फिल्म्स क्रिएशनने वितरणाची व्यवस्था सांभाळली आहे.