मुंबई - Rashmika Mandanna misses Kashmir : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या 'अॅनिमल' चित्रपटाला मिळत असलेल्या यशाचा सुखद अनुभव घेतेय. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक होत असताना ती या चित्रपटाच्या शूटिंगच्या आठवणीत रमली आहे. इंस्टाग्रामवर रश्मिकानं चाहत्यांना बर्फात मजा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. याच्या पार्श्वभूमीवर तिनं 'अॅनिमल'मधील 'काश्मीर' हे गाणं वाजताना ऐकू येतंय. व्हिडिओमध्ये, तिनं निळ्या रंगाची जीन्स परिधान केली असून ती बूटासह रंगीत जम्परसह दिसत आहे. 'काश्मीर' हे गाणे मनन भारद्वाज आणि श्रेया घोषाल यांनी गायले असून या गाण्याचे संगीत आणि लेखनही मनन भारद्वाज यांनी केले आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय, "या गाण्यातलं केवळ काश्मीरचं नाही तर हे गाणंही मला खूप आवडतं. या व्हिडिओत बर्फ पडतोय त्यामुळे मला वाटतं की हा परफेक्ट गाण्यासाठीचा परफेक्ट व्हिडिओ आहे. माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल."
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात रश्मिकानं रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीची भूमिका केली आहे. अलिकडेच तिनं या चित्रपटात तिनं साकारलेल्या व्यक्तीरेखेबद्दल सांगितलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार, "मी साकारलेल्या गीतींजलीबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर ती संपूर्ण घराला बांधून ठेवणारी एक शक्ती आहे. ती प्रामाणिक आणि शुद्ध आहे, खरी आणि बिनधास्त, सशक्त आणि कणखर आहे. गीतांजलीच्या अशा वागण्याबद्दल कधी कधी मला प्रश्न पडायचे. त्यावेळी मला दिग्दर्शक संदीप यांनी तिची व्यक्तीरेखा नेमकी कशी आहे ते समजावून सांगितलं. ते म्हणाले की, ही रणविजय आणि गीतांजलीची कथा आहे. त्यांचं प्रेम, उत्कटता, त्याचं कुटुंब आणि त्याचं जीवन हेच आहे."
रश्मिका पुढे म्हणाली, "सर्व हिंसा, दुःख आणि असह्य वेदनांनी भरलेल्या या जगात गीतांजली शांतता आणि शितलता आणेल.. ती आपला पती आणि तिच्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी तिच्या देवांना साकडं घालेल. कोणत्याही वादळाशी सामना करण्याची तयारी ठेवत ती आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असेल."
चित्रपटातील तिचं पात्र आजच्या सशक्त आणि स्वतंत्र असलेल्या स्त्रियांशी कसे संबंधित आहे हे तिने पुढे सांगितले. म्हणाली, "गीतांजली माझ्या नजरेत अतिशय सुंदर आहे, आणि काही अर्थाने ती बहुतेक महिलांसारखी आहे ज्या मजबूतपणे आपल्या कुटुंबासाठी उभ्या आहेत आणि दिवसेंदिवस आपल्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत.."