मुंबई - Rashmi Agdekar Marathi debut : 'तुम्ही हिंदीत कधी दिसणार?' असा प्रश्न साधारणतः प्रत्येक प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्या कलाकाराला विचारला जातो. परंतु हिंदी चित्रपटांमध्ये अनेक प्रादेशिक भाषिक कलाकार काम करीत असतात. परंतु त्यांना 'तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपटांत का दिसत नाही?' असा प्रश्न सहसा कुणी विचारताना दिसत नाही. मराठी चित्रपटांत निरनिराळे प्रयोग होत असतात त्यामुळे त्याकडं बाकी भाषिक कलाकार अभिमानानं बघत असतात. अनेक अमराठी कलाकार मराठी चित्रपटांमध्ये काम करायला तयार असतात, किंबहुना बरेच जण मराठी सिनेमांचा भाग बनले आहेत. त्यामुळे जेव्हा एखादा मराठमोळा कलाकार हिंदीत काम करून मराठीत आल्यावर अधिक चांगलं वाटतं. हिंदी मनोरंजनसृष्टीत कार्यरत असलेली मराठमोळी अभिनेत्री रश्मी आगडेकर आपल्या मातृभाषेत आगामी 'रावसाहेब' या मराठी चित्रपटातून पदार्पण करत आहे.
'रावसाहेब'चं दिग्दर्शन 'गोदावरी’ चित्रपटाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक निखिल महाजन यांनी केलं असून रश्मीला मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलं पाऊल आश्वासक वाटत आहे. रश्मी आगडेकर गेली ५-६ वर्षे मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून तिने 'देव डीडी’ या हिंदी वेब सीरिजमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 'इम्यॅच्युअर' या टीव्हीएफ निर्मित सिरीजमधून तिचं नाव झालंय. त्यानंतर आयुष्मान खुराना आणि तब्बू अभिनित 'अंधाधुन' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. मराठीत काम करण्याची तिची इच्छा आता पूर्ण होत असून तिला मराठीत भरपूर काम करायचं आहे जेणेकरून तिच्या प्रतिभेला झळाळी मिळेल.
आपल्या मराठी पदार्पणाबद्दल बोलताना रश्मी आगडेकर म्हणाली की, 'मला नक्कीच मराठीत काम करायचं होतं. परंतु माझं येथील पदार्पण छान कथा, चांगला रोल आणि उत्कृष्ट दिग्दर्शक असलेल्या चित्रपटातून व्हावं असं मला वाटायचं. रावसाहेबच्या निमित्ताने हे सर्व जुळून आलं असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची मी आतुरतेने वाट बघत आहे. मला मुक्ता बर्वे, जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबत पदार्पणातच काम करायला मिळाले, हे माझे मी भाग्य समजते. मी माझ्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल अशी आशा आहे.' रश्मी आगडेकरचा मराठी पदार्पणीय चित्रपट 'रावसाहेब' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.