मुंबई - Rashid Khan meets Ranbir Alia : अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटर रशीद खानने अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना बॉलिवूड स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भेट घेतली. या भेटीचा आनंद त्यानं सोशल मीडियावर शेअर केलाय. रशिदने बॉलिवूडच्या या लोकप्रिय जोडप्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. बॉलिवूडच्या दिग्गज जोडप्याला भेटून खूप आनंद झाल्याचं त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
फोटोमध्ये राशिद, रणबीर आणि आलिया आनंदाने पोज देत असल्याचं दिसतं. तिघांनीही कॅज्युअल ड्रेस परिधान केल्याचं फोटोत दिसतं. रणबीर कपूरनं कॅपसह त्याचा लूक स्टायलिश बनवल्याचं तुम्ही पाहू शकता. राशिदनं हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर लगेचंच व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया आणि इमोजीचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळतंय. आलिया आणि रणबीर सध्या अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेतील अनेक चाहत्यांना भेटलेत. त्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत.
रणबीर आणि आलिया यांची एकत्र भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' चित्रपट रिजीज होऊन एक वर्ष झालंय. अलिकडेच आलियाचं हॉलिवूड पदार्पण असलेला 'हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट रिलीज झाला. यातील तिच्या भूमिकेचं जगभरातून कौतुक झालं. या चित्रपटामुळे ती आता प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांच्या पावलावर पाऊल टाकत ग्लोबल स्टार बनण्याच्या वाटेवर आहे.
'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि आलिया भट्ट प्रेमात पडले. काही काळ डेटिंग केल्यानंतर या स्टार जोडप्याने 14 एप्रिल 2022 रोजी रणबीरच्या मुंबईतील निवासस्थानी एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार केला. लग्नानंतर दोन महिन्यातच आलियाने प्रेग्नंट असल्याची बातमी चाहत्यांना दिली.
कामाच्या आघाडीवर आलिया भट्ट आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत झळकणार आहे. तर रणबीर कपूर दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘अॅनिमल’मध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.