मुंबई :राजेश मुंगासे या तरुणाने ४ महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात रॅप गाणे सोशल मीडियावर प्रसारित केले होते. त्यानंतर या रॅपरवर कथितरित्या महाराष्ट्र शासनाची बदनामी करण्याचा आरोप केला गेला होता. या रॅपरवर विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या राजेशवर पोलीस कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आज ठाणे जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्वक जामीन मंजूर केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष चिन्हावर केला दावा :उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेना पक्ष फोडला होता. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्ष चिन्हावर आपला दावा देखील केला होता. या घटनेनंतर शिवसेनेला खूप विरोध देखील झाला होता. यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये शासनाच्या विरोधी पक्षाकडून अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले होते. या सर्व प्रकाराबद्दल जनतेमध्ये विविध मते आणि मतमतांतरे निर्माण झाली होती. त्यावर हे रॅप गाणे बेतलेले होते.
अटकपूर्वच जामीन मंजूर : दरम्यान ठाणे जिल्ह्यातील तरुण राजेश मुंगासे याने समाज माध्यमावर शासनाच्या संदर्भात टीकात्मक गाणे रॅप पद्धतीने सादर केले, त्यानंतर प्रचंड विरोध याप्रकरणी पाहायला मिळाला. त्याचे हे रॅप समाज माध्यामावर खूप व्हायरल झाले होते. दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्याच्या आधारावर पोलिसांनी न्यायालयामध्ये त्याच्यावर आरोप पत्र दाखल केले होते. आज या खटल्याच्या झालेल्या सुनावणीमध्ये अटकपूर्वच जामीन मंजूर केला आहे.
रॅपमध्ये अपमानजनक शब्द : राजेश मुंगासे याने ज्या पद्धतीने रॅप करून गाणे म्हटले. त्यानंतर कल्याण येथील स्नेहल कांबळे शिवसेनेच्याच एका कार्यकर्त्याने त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. या रॅपमध्ये '५० खोके' आणि 'चोर' असे शब्द उच्चारले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची बदनामी करण्यात आली, अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला होता.