महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ranveer Singh to star in 'Don 3' : रणवीर सिंग बनणार 'डॉन ३', निर्मांत्यांनी केली अधिकृत घोषणा - Ranveer Singh to star in Don 3

फरहान अख्तर दिग्दर्शित करत असलेल्या 'डॉन ३' चित्रपटात रणवीर सिंग शीर्षक भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी एक व्हिडिओ टीझर शेअर करुन ही बातमी चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे 'किंग खान'चा 'डॉन'मधील वारसदार निश्चित झाला आहे.

Ranveer Singh to star in 'Don 3'
रणवीर सिंग बनणार 'डॉन ३', निर्मांत्यांनी केली अधिकृत घोषणा

By

Published : Aug 9, 2023, 12:16 PM IST

Updated : Aug 9, 2023, 1:21 PM IST

मुंबई - 'डॉन ३' चित्रपटाची घोषणा काल निर्माता दिग्दर्शक फरहान अख्तरने केली होती. त्यामध्ये 'डॉन'ची भूमिका कोण साकारणार याबद्दल लोकांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर यावरचा पडदा निर्मात्यांनी दूर केला असून रणवीर सिंग 'डॉन'च्या भूमिकेत असणार हे आता पक्के ठरले आहे.

फरहान अख्तरने जेव्हा 'डॉन ३' ची घोषणा केली तेव्हा ही भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग सक्षम असल्याचा दावा प्रेक्षकांनी केला होता. हा दावा आता खरा ठरल्याचे दिसून येत आहे. आज अधिकृतपणे रणवीर सिंग 'डॉन ३' मध्ये मुख्य भूमिका करत असल्याचे व्हिडिओ क्लिपद्वारे जाहीर करण्यात आले. टीझरमध्ये रणवीर सिंग हुडी परिधान करुन एका मोठ्या हॉलमध्ये पाठमोरा बसलेला दिसतो. त्याच्या समोरील काचेतून बाहेरील चकाचक शहर दिसून येते. यावेळी रणवीर सिंग स्वतः 'डॉन' असल्याचे व आपल्याला पकडणे अशक्य असल्याचा प्रसिद्ध डायलॉग आपल्या स्टाईलमध्ये बोलताना दिसतो.

फरहान अख्तरच्या लेखणीतून उतरलेला 'डॉन ३' चा पहिला डायलॉग असा आहे, 'शेर जो सो रहा है वो जागेगा कब, पुछते है ये सब. उनसे कह दो की फिर जाग उठा हूँ मैं और सामने जल्द आने को, क्या है ताकद मेरी, क्या है हिंमत मेरी, फिर दिखाने को. मौत से खेलना जिंदगी है मेरी, जितना ही मेरा काम है, तुम तो यह जानते हो क्या मेरा नाम है. ग्यारह मुल्कों की पुलीस ढुंढती है मुझे, पर पकड पाया है मुझ को कौन, मैं हूँ डॉन.'

या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या 'एक्सेल मुव्हीज'च्या वतीने केली जात आहे. 'डॉन' चित्रपटाचा पहिला भाग २००६ मध्ये आणि दुसरा भाग २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. १९७८ मध्ये अमिताभ बच्चन स्टारर 'डॉन' चित्रपट प्रचंड गाजला. याचे लेखन सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी केले होते. याचे हक्क फरहान आणि एक्सेल मुव्हीजने घेतले आणि त्याची फ्रँचाइज सुरू केली. आता पर्यंत दोन्ही भागात 'डॉन'ची भूमिका शाहरुख खानने साकारली होती. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या भागात ही भूमिका कोण करणार हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अमिताभ बच्चन हाच 'ओरिजिनल डॉन' आहे, हे वास्तव चित्रपटरसिकांनी स्वीकारले आहे. आता स्पर्धा आहे ती दुसऱ्या क्रमांकासाठी. शाहरुख खानपाठोपाठ 'डॉन' साकारणारा रणवीर सिंग आता 'मैं हूं डॉन' म्हणत स्वतःला नव्याने सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Last Updated : Aug 9, 2023, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details