मुंबई- हिंदी सिनेसृष्टील गुणी अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट अलिकडे प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगले कौतुक कले. चित्रपटाचा वेगळा विषय आणि आशय सामान्य प्रेक्षकांना भावला. यात राणीने साकारलेली मुलांसाठी सरकारच्या विरोधात बंड करुन लढणारी आई सर्वांना आवडली. असे असले तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अपेक्षित कमाई केली नाही. दहाव्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली आहे. काही प्रेक्षकांनी हा चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रतीक्षा केली असल्याचे दिसते. याबद्दल राणी मुखर्जीने नाराजी व्यक्त केली आहे.
ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा कल वाढला - गेल्या तीन वर्षामध्ये ओटीटीवर मनोरंजन करण्याची पद्धत वाढली आहे. कोविडच्या काळात व त्यानंतर अनेक महिने थिएटर्स बंद होती. त्यावेळी लोकांनी ओटीटीचा मार्ग अनुसरला. त्याचा फटका जगभरातील चित्रपट व्यवसायाला झाला आहे. त्यानंतर अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न करता थेट ओटीटीवर दाखवण्याचा पायंडाही काही निर्मात्यांनी पाडला. पण चांगला चित्रपट असेल तर लोक थिएटरमध्ये जातातच हे गेल्या काही वर्षात प्रकर्षाने जाणवले. पुष्पा, केजीएफ, विक्रम, पोन्नीयन सेल्वन, कंतारा, दृष्यम २ आणि अलिकडेच रिलीज झालेला पठाण या चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये खेचून आणले.