मुंबई - Ram Mandir Praan-Pratishtha Ceremony : अयोध्येत 22 जानेवारीला होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी देश विदेशातून दिग्गज पाहुण्यांना आमंत्रित केलं जात आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मुकेश अंबानी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपींची नावं निमंत्रितांच्या यादीत सामील आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सिनेतारकांसह अनेक सेलिब्रिटींना एकामागून एक निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सना निमंत्रण दिल्यानंतर आता जॅकी श्रॉफ यांच्या कुटुंबीयांना राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आमंत्रित देण्यात आलं आहे.
श्रॉफ कुटुंबाला आमंत्रण : राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात टायगर श्रॉफही दिसू शकतो. सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ आणि त्याची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी होण्याच्या आमंत्रणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोद्वारे त्यांनी स्वत:ला भाग्यवान मानले असून संस्थेचे आभार मानलं आहे. शेअर केलेल्या फोटोच्या पोस्टमध्ये जॅकीनं लिहिलं , ''आम्हाला 22 जानेवारीला अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होण्याचा बहुमान मिळाला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीयांच्या जीवनातील हा ऐतिहासिक क्षण आहे. आजचा दिवस घडवून आणण्यासाठी अनेक दशकांपासून सहभागी झालेल्या आणि योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, आदरणीय आरएसएस मान्यवर, सुनील आंबेकरजी, अजय मुडपेजी आणि आमचे प्रिय मित्र महावीर जैन ज्यांनी आमच्या घरी भेट देऊन शुभ आमंत्रण दिलंय. जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफनेही तिच्या इन्स्टाग्रामवर आमंत्रणाची पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान या सोहळ्यात साऊथचा सुपरस्टार धनुष आणि नवविवाहित जोडपे रणदीप हुडा आणि लीन लैशराम यांना प्राण प्रतिष्ठाचे आमंत्रण मिळाले आहे.