मुंबई - Ranbir Kapoor birthday : तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला बॉलिवूडचा नायक रणबीर कपूर गुरुवारी 41 वर्षांचा झाला. सोशल मीडियावर यानिमित्तानं त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळालं. रणबीरनंही या चाहत्यांसाठी आपला वेळ दिला आणि त्यांच्यासोबत एन्जॉय केलं. रणबीरचा वाढदिवस असल्यानं सकाळपासूनच त्याच्या घराबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती.
इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रणबीरचे काही चाहते आणि हौशी फोटोग्राफर्स आपल्या आवडत्या स्टारचा खास वाढदिवस साजरा करण्यासाठी केक घेऊन त्याच्या निवासस्थानाबाहेर जमताना दिसत आहेत. रणबीरनं त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत वाढदिवसाचा केकही कापला. त्यांनी घराबाहेर जमलेल्या काही लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढल्या. रणबीर करड्या रंगाच्या हुडीमध्ये नेहमी प्रमाणेच सुंदर दिसत होता. त्यानं निळ्या रंगाच्या जीन्ससह पांढरी टोपी घातली होती.
रणबीरच्या वाढदिवसानिमित्य त्याची आई नीतू कपूर, बहिण रिद्धीमा आणि पत्नी आलिया यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्याचा फोटो शेअर करताना आलियानं त्याच्यावरच आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याच्या सानिध्यात कसं जादुई वाटतं याबद्दल लिहिलं आहे. रणबीर कपूरची सासू सोनी राजदान यांनीही त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप प्रेम आणि आनंदाचा वर्षाव केला.
दरम्यान, कामाच्या आघाडीवर रणबीर कपूर लवकरच संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅनिमलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर काल रणबीरच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यामध्ये अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना पसंत पडल्याचं प्रतिक्रियावरुन लक्षात येत आहे. आगामी काळातील हा सर्वात हिट चित्रपट ठरणार असल्याचं भाकितही त्याचे चाहते करत आहेत. या चित्रपटातील अनिल कपूर आणि बॉबी देओलच्या भूमिकेवरही त्याचे चाहते खूश दिसत आहेत. या चित्रपटातील त्याचा आक्रमक अवतार यापूर्वी कधीच न पाहिल्या प्रमाणं अनोखा आहे.