नवी दिल्ली - Rajkumar Rao became national icon : राजकुमार राव याची नॅशनल आयकॉन म्हणून निवडणूक आयोगानं निवड केली आहे. नव तरुण मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याच्या हेतुने त्याची निवड करण्यात आलीय. राजकुमार राव याचा न्यूटन हा चित्रपट याच विषयावर प्रेरणा देणारा ठरला होता.
'न्यूटन' या चित्रपटात छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका अभिनेता राजकुमार रावने साकारली होती. या चित्रपटात तो एका सरकारी लिपिकाच्या भूमिकेत दिसला होता. नक्षलग्रस्त भागात निवडणूकीची एव्हीएम मशीन्स पोहोचतात. त्यासोबत निवडणूक अधिकारी, मतदान प्रक्रिया पार पाडणारे कर्माचारी, सुरक्षा रक्षकासह मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीनं मतदार मतदान केंद्राकडे फिरकत नाहीत. सर्व कर्मचारी कंटाळतात, पण न्यूटन मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी योजना आखतो. परिणामी नक्षवाद्यांच्या रडारवर तो येतो. एक निवडणूक कर्मचारी कशा पद्धतीनं ही लढाई जिंकतो याची रंजक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. या चित्रपटानं हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आणि ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीसाठी भारताच्या वतीने पाठवण्यात आला होता.
यापूर्वी निवडणूक आयोगानं अभिनेता पंकज त्रिपाठी, आमिर खान, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी आणि एमसी मेरी कोम यांना नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक मंडळ प्रमुख व्यक्तींची 'नॅशनल आयकॉन' म्हणून नियुक्ती करते.