विजयवाडा - तामिळ सुपरस्टार रजनीकांत शुक्रवारी येथे एनटीआर म्हणून प्रसिद्ध असलेले तेलगू आयकॉन नंदामुरी तारका रामाराव यांच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विजयवाडा येथे दाखल झाले आहेत. एनटीआर यांचा मुलगा आणि सुप्रसिद्ध टॉलीवूड अभिनेते एन.बालकृष्ण यांनी रजनीकांत यांचे येथील गन्नावरम विमानतळावर स्वागत केले. शहरात शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमाला सुपरस्टार रजनीकांत उपस्थित राहणार आहे. तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बलय्या या नावाने फिल्म इंडस्ट्रीत ओळखले जाणेरे लोकप्रिय अभिनेता बालकृष्ण यांनी चाहत्यांना उत्सवात भाग घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.
एनटीआर यांची प्रचंड लोकप्रियता - एनटीआर, यांना तेलुगू भाषिक लोकांमध्ये देवाचा दर्जा मिळाला होता, ते टॉलीवूडचा एक दिग्गज अभिनेता होते. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि पौराणिक पात्रांच्या भूमिका करण्यासाठी ते ओळखले जात होते. एनटीआर यांनी कृष्णार्जुन युद्धम (1962) आणि दाना वीरा सूरा कर्ण यांच्यासह 17 हून अधिक चित्रपटांमध्ये भगवान कृष्णाची भूमिका केली. स्वाभिमानाचा नारा देत त्यांनी 1982 मध्ये टीडीपी या नव्याने स्थापने केलेल्या पक्षासाठी झोकून देऊन राजकारणात प्रवेश केला आणि नऊ महिन्यांत सत्तेवर येऊन एक प्रकारचा विक्रम केला.