महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

राजेश खन्ना जयंती : लोकप्रितेचं उत्तुंग शिखरं गाठणारा पहिला सुपरस्टार - अभिनेता राजेश खन्ना

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्मदिन आहे. हिंदी सिनेसृष्टीतील या पहिल्या सुपरस्टारने आपल्या काळात गाठलेली लोकप्रियतेची उंची त्यानंतरही कोणी गाठू शकलेलं नाही. सलग 15 चित्रपट सुपरहिट होण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर अबाधित आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना आठवण्याचा प्रयत्न करुयात.

Rajesh Khanna birth anniversary
राजेश खन्ना जयंती

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 11:38 AM IST

मुंबई- हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिभावान आणि देखणा अभिनेता राजेश खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वकाळातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. या सुपरस्टारने हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 15 बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले आणि एक नवा इतिहास रचला. नमक हराम, आनंद, अमर प्रेम, आराधना, कटी पतंग, दाग, परेश आणि सफर यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या अफाट यशामुळे तो रुपेरी पडद्यावरचा खऱ्या अर्थाने सुपरस्टार बनला. आजही देशातील तमाम चाहत्यांच्या मनात त्याची तीच प्रतिमा अबाधित आहे.

सुपरस्टार राजेश खन्ना हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अभूतपूर्व चमत्कार होते. 1965 मध्ये राजेश खन्नाने फिल्मफेअर आणि युनायटेड प्रोड्यूसर्सने आयोजित केलेल्या ऑडिशन्समधून हिंदी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. त्याला मिळालेलं यश, प्रसिद्धी, अफाट लोकप्रियता यापूर्वी भारतात दुसऱ्या कोणाही अभिनेत्याला लाभली नव्हती. त्याचं आयुष्य अगदी स्वप्नवत वाटावं असंच होतं. लोक त्याच्या पायाची माती कपाळाला लावायचे, तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणी स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं प्रेमपत्र त्याला पाठवायच्या. विश्वास बसणार नाही परंतु, असंख्य तरुणींनी त्याच्या फोटोसोबत लग्न केले होते. तो जिथे जायचा तिथे असंख्य तरुणींचा गराडा त्याच्याभोवती पडायचा. मुली त्याच्या कारचं चुंबन घ्यायच्या. त्याची पांढऱ्या रंगाची कार काहीवेळातच तरुणींच्या चुंबनाने लिपस्टीकच्या रंगात न्हाऊन निघायची. लोकप्रियतेची इतकी मोठी ऊंची आजपर्यंत इतर कुठलाही स्टार गाठू शकला नाही.

राजेश खन्नांच्या पहिल्याच चित्रपटाला मिळाली होती ऑस्करमध्ये एंट्री -अभिनेता राजेश खन्ना यांना बॉलिवूडमध्ये काका या नावानंही ओळखलं जात होतं. त्यांनी 1966 मध्ये 'आखरी खत' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1967 मध्ये 40 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी भारतीय प्रवेश म्हणून या चित्रपटाची निवड करण्यात आली होती, परंतु त्याला नामांकन मिळाले नव्हते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 25 वर्षांच्या कारकिर्दीत दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांनी 168 हून अधिक चित्रपटातून आणि 12 लघुपटांमध्ये भूमिका साकारल्या. राजेश खन्ना यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार आणि चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (हिंदी) बीएफजेए पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले होते.

राजेश खन्ना यांनी 16 वर्षे वय असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केले होते. दोघांच्या वयामध्ये 15 वर्षाचे अंतर होते. 1974 मध्ये डिंपल आणि राजेश यांना पहिली मुलगी ट्विंकल झाली आणि 1977 मध्ये रिंकीचा जन्म झाला. विशेष म्हणजे राजेश खन्ना यांच्या जन्मदिनी त्यांची मुलगी ट्विंकल जन्माला आली होती. त्यानंतर ते दोघे मिळून आपला वाढदिवस साजरा करत असत.

राजेश खन्ना यांना केवळ रुपेरी पडद्यावर नाही तर राजकारणाच्या मैदानातही उत्तम यश मिळालं होतं. 1992 ते 1996 दरम्यान ते नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून 10 व्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. राजेश खन्ना यांचे 18 जुलै 2012 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. आज ते आपल्यात हयात नसले तरी त्यांच्या चित्रपटातून ते अमर आहेत. त्यांनी म्हटलेले अनेक संवाद आणि गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.

हेही वाचा -

  1. प्रभास स्टारर 'सालार'ने भारतात गाठला 300 कोटींचा आकडा
  2. 'अभिनेता विजयकांत गेला यावर विश्वास बसत नाही'; 9 वीतील मित्रानं जागवल्या 'कॅप्टन'च्या आठवणी
  3. 'धूम' फ्रँचाईजमध्ये किंग खान असू शकतो आगामी आकर्षण?

ABOUT THE AUTHOR

...view details