मुंबई - मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट बनले आहेत आणि बनतही आहेत. त्यात अजून एका चित्रपटाची भर पडणार असून तो चित्रपट मनसे अध्यक्ष राज ठाकरे बनविणार आहेत. त्यांनी हे नुकतेच तेजस्विनी पंडित सोबत एका ओटीटी वेब सिरीज च्या समारंभात गप्पागोष्टी करताना सांगितले. त्यांनी सुरुवातच कोटी करत केली. “मराठी घरांमध्ये ओटी भरण्याची पद्धत आहे, ओटीटी पाहण्याची नाही”. ते पुढे असेही म्हणाले की, ‘सध्या महाराजांवर शिवकालीन चित्रपट भरपूर प्रमाणात येत आहेत. त्यामुळे मी आताच काही तो बनविणार नाही. परंतु त्यावर काम सुरु असून त्याची घोषणा योग्यवेळी करण्यात येईल.”
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “मी रिचर्ड ऍटनबरो यांनी बनविलेला ‘गांधी’ हा चित्रपट बघितल्यावर बराच प्रभावित झालो होतो. तेव्हाच मनात विचार आला होता की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर इतकाच भव्यदिव्य चित्रपट बनायला हवा. मी प्रामुख्याने कलाप्रेमी व्यक्ती आहे आणि राजकारणात अनपेक्षितपणे आलो. मला फिल्म मेकिंग मध्ये नेहमीच रस होता. राजकारणात व्यस्त झाल्यामुळे तिथे लक्ष देता आले नाही. पण मला छत्रपती शिवाजी महाराजांवर तीन भागात चित्रपट बनवण्याची इच्छा आहे. तसेही मला दोन दगडांवर पाय ठेऊन काम करायला आवडत नाही.”