मुंबई - नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांत 'मी वसंतराव’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन साठीचे पुरस्कार आपल्या नावावर केले. यंदाच्या ६८ व्याराष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन यासाठी अनमोल भावे यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराबाबत राहुल देशपांडे म्हणाले की, ‘हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझे नाव या पुरस्कारासाठी जाहीर झाले त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव माझे असले तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली.’’
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसंच सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन पुरस्कारदेखील अनमोल भावे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी मिळाला आहे.