मुंबई Rahul Chopra in role of Nitin Gadkari : महाराष्ट्राचे धडाडीचे नेते नितीन गडकरी यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर झळकले असून यातील 'गडकरी' यांचा चेहरा समोर आला आहे.
कोण साकारणार कांचन गडकरींची भूमिका - नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख दिसतील तर पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित 'गडकरी' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'गडकरी'ची कथा, पटकथाही अनुराग राजन भुसारी यांची असून अनुराग भुसारी, मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.