मुंबई- आपल्या देशात लहानपणी क्रिकेट खेळला नाही असा एकही इसम सापडणार नाही. क्रिकेट हा खेळ जरी इंग्रजांकडून हुंड्यात मिळाला असला तरी तो भारतात इतका खेळाला जातो तेवढा इंग्लंडमध्ये सुद्धा खेळला जात नसेल. आपल्याकडील गल्ली क्रिकेटमधून बरेच क्रिकेटर उदयास आलेले आहेत. आता क्रिकेटमध्ये निरनिराळे फॉर्म्स आले असून कमी वेळात जास्त थरार अनुभवायास मिळतो तो म्हणजे टी २० मध्ये. या २०-२० ओव्हर्सच्या खेळात अधिक गती असून तिचे वेड आता महिलांपर्यंत सुद्धा पोहोचले आहे. लहान मोठे पुरुष आणि आता महिला सुद्धा क्रिकेट बघण्यात रस घेऊ लागल्या आहेत. इतकेच नव्हे तर महिला क्रिकेट खेळू लागल्या असून भारताची महिला क्रिकेट टीमसुद्धा जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे करीत आहे. क्रिकेट आणि चित्रपट यांची सांगड घातली जाते आणि अधनं मधनं त्यावर सिनेमेदेखील बनत आले आहेत. असाच एका सिनेमा कच्चे लिंबू डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. जिओ स्टुडिओजची निर्मिती असलेल्या कच्चे लिंबू या चित्रपटात राधिका मदान, रजत बरमेचा आणि आयुष मेहरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
राधिका मदनची बुमराह स्टाईल- कच्चे लिंबूमध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटलेल्या जीवनात आपल्या स्वप्नांना विसरू नये असा सल्ला दिला गेला आहे. यात बहीण भावाच्या नात्यात होणारे भावनिक द्वंद्व दिसून येणार असून यात क्रिकेट सुद्धा आहे. यात राधिका मदान बहिणीच्या भूमिकेत असून ती आपल्या लाडक्या भावाच्या टीमच्या विरोधात गल्ली क्रिकेट ची मॅच खेळताना दिसेल. यातून निर्माण होणारे ताणतणाव आणि भावनिक उलथापालथ दिसून येईल. महत्वाची बाब म्हणजे गल्ली क्रिकेट खेळताना राधिका मदान चक्क भारतीय तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह च्या स्टाईल ने गोलंदाजी करताना दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे शुभम योगी यांनी. हा चित्रपट एक भावनिक रोलरकोस्टर असून अदिती, जिची भूमिका राधिका साकारत आहे, तिचे कुटुंब, मित्र आणि विशेषतः भाऊ यांची प्रेरणास्थान आहे कारण ती त्यांना शिकविते की आयुष्यात नेहमीच सर्व सुरळीत होत नाही आणि त्याबद्दल वाईट वाटून घेण्याची गरज नाही.