मुंबई - अभिनेता आर माधवन हा चित्रपट निर्माता विकास बहलच्या आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटात सुपरस्टार अजय देवगणसोबत काम करणार आहे, अशी घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी शनिवारी केली. आगामी चित्रपटात अजय आणि माधवन पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. या चित्रपटासाठी अजय देवगण चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे. त्याने दृष्टीम 2 चे निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांच्यासोबत काम केले आहे. अजय देवगण फिल्म आणि पॅनोरमा स्टुडिओच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
अजय देवगण आणि माधवन पहिल्यांदाच एकत्र- सुपरस्टार अजय देवगण आणि माधवन हे पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र काम करणार आहेत. निर्मात्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनच्या स्थितीत आहे आणि पुढील महिन्यात चित्रपटाचे शुटिंग सुरू होईल. मुंबई, मसुरी आणि लंडनमध्ये या चित्रपटाचे शुटिंग पार पडणार आहे. अजय आणि माधवन या दोन अभिनेत्यांशिवाय आणखी एक पॉवर स्टार चित्रपटात घेण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. हा अभिनेता कोण असेल याची निर्णय लवकरच समोर येईल. अद्याप शीर्षक न मिळालेला हा चित्रपट विकास बहलचे पहिले सुपरनॅचरल विषयावरील दिग्दर्शन असेल. क्वीन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटासाठी ओळखला जाणारा विकास बहल, प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्याच्या मोहिमेवर दिसतो आहे कारण तो वेगवेगळ्या शैलींमध्ये वावरत आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट गुडबाय हा स्लाइस-ऑफ-लाइफ चित्रपट होता, तर टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांची भूमिका असलेला अॅक्शन ड्रामा गणपती हा त्याचा आगामी चित्रपट आहे.