हैदराबाद -Pushpa Movie :तेलुगू अभिनेता जगदीश प्रताप भंडारीला एका महिला कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी हैदराबादमध्ये अटक करण्यात आली होती. जगदीश प्रताप बंडारीवर एका महिलेचे पुरुषासोबत फोटो काढून धमकावण्याचा आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. जगदीशनं अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा' मध्ये काम केलं आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना काही पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर आता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
- पोलीस तपासात समोर आलं की, पूर्वी त्याच्या जवळ असलेल्या या महिलेला तो दुसऱ्या पुरुषाच्या जवळ जाताना बघू शकत नव्हता. म्हणून त्यानं तिला तिचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अलीकडेच पुंजागुट्टा पोलिसांनी मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या जगदीशला दोन दिवस चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
जगदीश प्रताप बंडारीवर गुन्हा दाखल :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निमित्तानं हैदराबाद शहरात पोहोचलेल्या जगदीश प्रताप बंडारी याची पाच वर्षांपूर्वी या मुलीशी ओळख झाली. काही काळानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, 'पुष्पा'मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेमुळे जगदीश प्रसिद्ध झाला. या चित्रपटानंतर त्याला चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले. त्यामुळे त्याच्या वागण्यात बदल झाला. मुलीला त्याचा हा बदल आवडला नाही. तिनं दुसऱ्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली. हे कळाल्यानंतर जगदीश हा संतप्त झाला. जगदीशला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला त्याच्या आयुष्यात परत आणयाचं होतं. तो नोव्हेंबर 27 तारखेला पंजागुट्टा येथील मुलीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यानं तिला दुसऱ्या पुरुषाशी जवळीक साधताना पाहिलं होतं. त्यानं तो क्षण आपल्या फोनवर कैद केला.