पुणे - पुण्यात रविवारी राजा बहादूर मिल परिसरात प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांची लाईव्ह कॉन्सर्ट ला जवळपास एक लाखाच्यावर पासेस देण्यात आले होते. परंतु या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये वेळेचे बंधन न पाळल्यामुळे, ए आर रहमान यांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. कार्यक्रमाची वेळ ही चार ते दहा असताना ए आर रहमान यांनी संध्याकाळी उशिरा दहा नंतर कार्यक्रम सुरू ठेवला. त्यामुळे पुणे पोलिसांनी स्टेजवर येऊन त्यांचा कार्यक्रम बंद केला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संगीतकारांना पुणे पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवल्याच्या चर्चा सध्या पुण्यात होत आहेत.
वेळेचे बंधन ओलांडल्याने पोलिसांची कारवाई - याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे पोलीस यांनी ए आर रहमान यांच्या कार्यक्रमाला रात्रीच्या दहापर्यंत परवानगी दिली होती. परंतु ए आर रहमान यांच्या कॉन्सर्टला होणारी गर्दी ही लाखाच्यावर होती. त्यामुळे कार्यक्रमांमध्ये रहमान यांनी जशी जशी रंगत आणली, तसेच कार्यक्रम लांबत होता त्याचवेळी पुणे पोलीस निरीक्षक याने 10 नंतर कार्यक्रम सुरू असल्याने स्टेजवर येऊन कार्यक्रम बंद केला. त्याचबरोबर पोलिसांनी रहमान यांना खडे बोल सुनावले आहेत. 'कोर्टाच्या आदेशानुसार 10 नंतर कार्यक्रम घेता येत नाही. हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही असा कार्यक्रम कसा चालू ठेवता', अशी विचारणा पुणे पोलिसांनी त्यांना केली. त्यानंतर ए आर रहमान यांनी आपल्या कार्यक्रम बंद केला आणि ते गुपचूप स्टेजच्या पाठीमागून निघून गेले.