मुंबई - Malti Marie's 2nd birthday : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूडचा गायक-अभिनेता निक जोनास यांनी मुलगी मालती मेरीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. मालती दोन वर्षांची झाली असून ती तिच्या आई-वडील आणि आजी मधु चोप्रासोबत मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेली होती. प्रियांकानं काही फोटो आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मालतीचे आई-वडील आणि आजी देवीचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. मालती मेरीचा वाढदिवस 15 जानेवारी रोजी झाला. या विशेष प्रसंगी देसी गर्ल प्रियांका आणि निक जोनासनं एका पार्टीचं आयोजन केलं होतं.
मालती मेरी जोनासचा वाढदिवस :मालतीच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियांका आणि तिचा पती निक जोनास आपल्या मुलीसोबत खूप मस्ती करताना दिसले. प्रियांकानं फोटो शेअर करत तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ती आमच्यासाठी खूप खास आहे आणि ती दोन वर्षांची झाली आहे'. शेअर केलेल्या एका फोटोमध्ये बर्थडे गर्ल मालतीने पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. यावर तिनं मोठा फुलांची मालाही घातली आहे. याशिवाय तिनं कपाळावर छान छोटी टिकली लावलेली आहे. या लूकमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रियांका मालतीसोबत मंदिरात उभी असल्याचं दिसत आहे. आणखी एका फोटोमध्ये निकनं मालतीला हातात पकडलं असून या फोटोत प्रियांकाची आई मधू चोप्रा देखील त्यांच्यासोबत उभी आहे.