नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी X वर सायरा बानो यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, "सायरा बानो जी यांना भेटून खूप छान वाटलं. सिनेविश्वात त्यांनी केलेल्या कामांचं पिढ्यानपिढ्या कौतुक करत आल्या आहेत. आमच्यात अनेक विषयांवर चांगली चर्चा झाली."
दिवंगत दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांनी 1961 मध्ये शम्मी कपूर यांच्यासोबत 'जंगली' चित्रपटातून हिंदी चित्रपटांत अभिनयाची सुरुवात केली. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांना 'शागिर्द' (1967), 'दीवाना' (1967) आणि 'सगीना' (1974) साठी आणखी तीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे नामांकनंही मिळाली होती. सायरा बानू यांनी 'ब्लफ मास्टर' (1963), 'आयी मिलन की बेला' (1964), 'झुक गया आसमान' (1968), 'पडोसन' (1968), 'व्हिक्टोरिया नंबर 203' '(1972), 'हेरा फेरी' (1976) आणि 'बैराग' (1976)यासह अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ग्रॅमी नामांकनांच्या यादीत समाविष्ट झालं आहे. मोदींचं योगदान असलेल्या 'अबंडन्स् इन मिलेटस्' या गाण्याला सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत कामगिरी श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाला प्रस्ताव दिल्यानुसार 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष' म्हणून साजरं केलं जातंय. यावरुनच 'अबंडन्स इन मिलेटस्' हे गाणं प्रेरित आहे.
पीएम मोदी आणि भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह आणि तिचे पती गौरव शाह यांनी या खास गाण्याच्या निर्मितासाठी विशेष योगदान दिलंय. या गाण्यात पीएम मोदींनी केलेलं भाषणदेखील आहे. फाल्गुनी शाह यांच्या वेबसाइटवरील निवेदनानुसार जागतिक भूक कमी करण्यासाठी आणखी एक संभाव्य गुरुकिल्ली म्हणून सुपरग्रेनबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी हे विशेष गाणे तयार करण्यात आलंय.