मुंबई - Prabhas Wedding :प्रभास त्याच्या आगामी 'सालार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता त्याच्या लग्नाबद्दल चर्चा होत आहे. सध्या साऊथ सुपरस्टार प्रभासचं नाव बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत जोडलं जात आहे. या लिंक-अपच्या बातम्यांमुळे प्रभासचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत असतं. आता सध्या प्रभासची मावशी श्यामला देवी यांनी त्याच्या लग्नाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रभासच्या मावशीनं त्याच्या लग्नाबद्दल म्हटलं, 'आमच्याकडे दुर्गमाचा आशीर्वाद आहे. देव आपल्या सर्वांची चांगली काळजी घेतो. प्रभास नक्कीच लग्न करणार आहे. त्यांचं लग्न हे लवकरच होणार आहे. आम्ही तुम्हा सर्व माध्यमांना लग्नासाठी आमंत्रित करू आणि उत्सवही साजरा करू', असं त्यांनी सांगितलं.
प्रभास करणार लग्न : प्रभासनं त्याच्या लग्नाचं लोकेशन आधीच ठरवलं आहे. 'आदिपुरुष'च्या प्रमोशनदरम्यान प्रभासनं त्याच्या लग्नाच्या योजनांबद्दल सांगितलं होतं. प्रभासला लग्नाबद्दल विचारलं असता त्यानं सांगितलं होत की, 'मी तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे'. ही घोषणा ऐकून चाहते खूप खूश झाले होते. प्रभास कधी लग्न करणार, हे त्यानं आतापर्यत जाहीर केलेलं नाही. प्रभासचं नाव क्रिती सेनॉनसोबत जोडले जात असून तो दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीला डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. आता तो नेमकं कोणाशी लग्न करणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रभास सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'सालार'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.