मुंबई - अभिनेता प्रभास गेल्या आठवड्यात 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची झलक लॉन्च केल्यानंतर खूप चर्चेत आला होता. सॅन दिएगो कॉमिक कॉन २०२३ मध्ये प्रबासच्या प्रजोक्ट के चित्रपटाचे शीर्षक लॉन्च करण्यात आले. प्रोजेक्ट के म्हणजे 'कल्की २८९८ एडी' चित्रपट असल्याचा खुलासा यानिमित्ताने जगाला झाला. अमेरिकेतील या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर तो आता मायदेशी परतला आहे. हैदराबाद विमानतळावर उतरल्यांतर त्याला पापाराझींनी कॅमेऱ्यात बंद केले.
यावेळी प्रभास त्याच्या नेहमीच्या एअरपोर्ट लूकमध्ये काळी पँट आणि ओव्हरसाईझ स्वेट शर्ट परिधान केलेला दिसला. यावेळी त्याने सुरक्षेच्या कारमासाठी तोंडावर मास्कही घातला होता. आदिपुरुष चित्रपटानंतर प्रभासने काही काळ अमेरिकेत सुट्टी घालवली आणि गुढघेदुखीसाठी त्याने फिजिओथरपीकडे उपचारही घेतले. त्यानंतर तो 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाच्या लॉन्च सोहळ्यासाठी दिग्दर्शक नाग अश्विन व सहकलाकार कमल हासन आणि राणा दग्गुबातीसह हजर राहिला होता.
'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची पहिली झलक शुक्रवारी रात्री एका भव्य सोहळ्यात लॉन्च करण्यात आली. भारतीय पौराणिक विषयावरील हा सायन्स फिक्शन चित्रपट असल्याचे टीझरमधून स्पष्ट झाले. चित्रपटाची झलक जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र आहे. एका वेगळ्या विषयावरील भव्य भारतीय चित्रपट नाग अश्विनने बनवल्याचे कौतुकास्पद चर्चा होताना दिसते. या चित्रपटात कमल हासन खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. व्हिलन जितका बलवान आणि घातक असतो तितकाच त्याला पराभूत करणे नायकासाठी आव्हानात्मक असते. सकारात्मकता पुढे जाण्यासाठी नकारात्मकता संपवणे आवश्यक असते, असे म्हणत कमाल हासनने ही भूमिका का स्वीकारली त्याबद्दलचे कारण दिले होते. प्रभास विरुद्ध कमाल हासन यांच्या जबरदस्त सामना चित्रपटात पाहायला मिळणार याचे संकेत यातून मिळाले आहेत.
या आधी नाग अश्विन यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री सावित्रीच्या जीवनावर आधारित 'महानटी' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'कल्की २८९८ एडी' चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पदुकोण भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. मुव्हिजने बनवलेला हा चित्रपट आजवरचा सर्वात जास्त बजेटचा चित्रपट आहे. चित्रपटाच्या म्यूझिक स्कोअरसाठी संगीतकार संतोष नारायणन यांची निवड निर्मात्यांनी केली आहे.