मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे नुकतेच नामकरण झाले असून या चित्रपटाबाबत एक बातमी समोर येत आहे. 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यासाठी ही बातमी त्रासदायक ठरू शकते. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याच्या बातम्या आता समोर येत आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार होता. आता 'कल्की २८९८ एडी'चा रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहेत. हा चित्रपट मेगा बजट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विनने केले आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, दिशा पठाणी, कमल हसण असे कलाकार दिसणार आहेत.
आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : हा चित्रपट आता १२ जानेवारी २०२४ ऐवजी ९ मे २०२४ रोजी प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे. 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे जाण्यासाठी निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. एकीकडे मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही बोलले जात आहे की, चित्रपटाचे निर्माते अश्विन दत्त यांनी चित्रपटाच्या रिलीजची डेट पुढे वाढवली आहे. ९ मे हा दिवस निर्मात्यासाठी खास असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, असे म्हटले जात आहे की, 'कल्की २८९८ एडी' रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचे कारण चित्रपटाच्या व्हीएफएक्सवरील काम आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम सध्या सुरू आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट ६०० कोटीमध्ये बनला आहे.