मुंबई- अभिनेता प्रभासचा आदिपुरुष चित्रपट बॉक्स ऑफिसवर फसल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये थोडे निराशेचे वातावरण आहे. अशातच त्याचा प्रोजेक्ट के हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. प्रभासच्या बहुप्रतीक्षित चित्रपट प्रोजेक्ट के बद्दल सर्वात अलीकडील घडामोड लक्ष वेधणारी आहे. या चित्रपटाचे लॉन्चिग मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आंतरराष्ट्रीय इव्हेन्टमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. प्रभासने त्याच्या इनस्टाग्रामवरुन ही बातमी खात्रीशीर असल्याचा दुजोरा दिलाय.
प्रभासने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'यासाठी माझा उत्साह लपवू शकत नाही. लवकरच सॅन डिएगो येथे भेटू.' प्रभासने ही पोस्ट करताच चाहत्यांनी प्रोजेक्ट के टीमवर शुभेच्छांचा वर्षाव करत कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पोस्टला प्रतिसाद देताना, एका चाहत्याने लिहिलं, प्रभास हा भारतीय सिनेमाचा अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर आहे. दुसर्या चाहत्याने लिहिलंय, जग हे प्रभास क्षेत्र आहे. आणखी दुसर्या सोशल मीडिया युजरने लिहिले, भारतीय सिनेमाचा दर्जा उंचावला. प्रोजेक्ट के चित्रपटामध्ये प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अनन्य फुटेजचा पहिला लूक सॅन डिएगो कॉमिक-कॉन २०२३ येथे होईल. २० जुलै रोजी विशेष पाहुणे उलगनायगन कमल हासन, सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पदुकोण आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नाग अश्विन यांच्यासह या सोहळ्याला हजर राहतील.
या निमित्ताने प्रोजेक्ट के चे निर्माते सॅन डिएगो येथे दरम्यान कॉमिक-कॉनच्या सर्वात मोठ्या स्टेजवर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अनुभव देतील. यामध्ये ते चित्रपटाचे शीर्षक, ट्रेलर आणि रिलीजची तारीख जाहीर करतील. चित्रपट निर्माते नाग अश्विन यांनी या खास प्रसंगी आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, 'भारत हे आतापर्यंत काही महान दिग्गजांचे आणि सुपरहिरोचे जन्मस्थान आहे. आमचा असा विश्वास आहे की आमचा चित्रपट लोकांपर्यंत हे प्रकट करण्याचा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. आणि कॉमिक-कॉन आम्हाला आमची कथा जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आदर्श व्यासपीठ बहाल करत आहेत.'