मुंबई - सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मसवर बरीच हालचाल होताना दिसतेय. हिंदी वेब सिरीज सोबत प्रादेशिक मालिकाही मोठ्या प्रमाणात बनताहेत, ज्यात मराठी वेब सिरीज सुद्धा मोडतात. ओटीटी वर अजूनतरी सेन्सॉरशिप नसल्यामुळे अनेक बोल्ड विषय, बोल्ड भूमिका, बोल्ड दृश्ये सर्रास दिसतात. खासकरून मराठी वेब सिरीजमध्ये बऱ्याचदा बोल्ड भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींची इमेज सोज्वळ असते. त्या बिनधास्त भूमिकांतून अंगप्रदर्शन अथवा/आणि अर्वाच्य भाषेत बोलताना दिसल्या तर ते अनेक प्रेक्षकांना शॉकींग असते. आता असाच एक शॉक मराठी प्रेक्षकांना मिळणार आहे कारण मराठी मालिकांमधून सोज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा कातुर्डे 'गेमाडपंथी' या वेब सिरीजमध्ये बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजात दिसणार आहे.
गेमाडपंथी वेब सिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठीची असून नुकतेच या नव्या वेबसीरिजचे बोल्ड टिझर प्रदर्शित करण्यात आले. या वेब सिरीजचे नाव अतिशय भिन्न असून ते कदाचित हेमाडपंथी या शब्दावरून घेतले असावे. दगडाचे बांधकाम ते एकमेकांत गुंफून केलेलं असेल तर त्याला हेमाडपंथी म्हणतात. या मालिकेच्या नावावरून आणि टिझर पाहून अशी कल्पना येते की ती देहविक्रय करणाऱ्या वातावरणात गुन्हेगारी आणि राजकारण घडताना होणारे गेम यावर बेतलेली असावी. याच गेमचा आधार घेऊन चालणाऱ्यांना गेमाडपंथी असे संबोधित केले गेले असावे. अर्थात हा अंदाज असून मालिका पाहून खरी कल्पना येईल.