मुंबई- पूजा हेगडे हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रथितयश नाव. पूजाने सौंदर्यवती स्पर्धेत यश मिळविल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावले आणि नंतर मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकले. प्रथमतः पूजा हेगडेने ‘मुगामूडी’ या तामिळ चित्रपटातून पदार्पण केले आणि नंतर ती ‘ओका लैला कोसम’ या तेलगू चित्रपटातून झळकली. पूजाने सर्व दाक्षिणात्य भाषांमधून काम केले आहे परंतु तिचा जन्म कर्नाटकातला असूनही तिने अजूनपर्यंत तरी कन्नड भाषेत चित्रपट केलेलं नाही. पूजा हेगडेने ‘मोहेंजोदारो’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिचा पहिला हिरो होता ह्रितिक रोशन. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही त्यामुळे पूजाने आपला मोर्चा पुन्हा एकदा साऊथ फिल्म्सकडे वळविला. दाक्षिणात्य सिनेमांत ती प्रचंड यश मिळवीत राहिली आणि अधनं मधनं बॉलिवूड चित्रपटातून सुद्धा ती दिसू लागली. हाऊसफुल ४, सर्कस सारख्या हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर पूजा आता थेट सुपरस्टार सलमान खानची हिरॉईन म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून. नुकतीच आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी तिची भेट घेतली आणि पूजा सोबत दिलखुलास संवाद साधला.
तुला जेव्हा कळले की तू सलमान खान ची हिरॉईन बनणार आहे तेव्हा तुझ्या मनात काय आलं? - अर्थात, खूप आनंद झाला. मी पक्की मुंबईकर आहे आणि हिंदी चित्रपट बघत लहानाची मोठी झालीय. सलमान खान हे एक मोठे नाही तर उत्तुंग नाव आहे. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा मला ऑफर झाला तेव्हा सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. परंतु नंतर माझ्यावर किती रिस्पॉन्सिबिलिटी आहे याची जाणीव झाली आणि तयारीला लागले. सलमान खानचे चित्रपट अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात. त्याचे फॅन फॉलोईंग प्रचंड आहे म्हणून त्याच्या सिनेमाचा रिच खूप मोठा आहे. त्यामुळे अर्थातच मी या चित्रपटात असल्यामुळे माझे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याचा आनंद आहे. सलमान खानचा चित्रपट म्हटल्यावर तो त्याच्या भोवती फिरणारा असणार असे वाटणे साहजिकच आहे. परंतु ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये माझाही रोल तितक्याच ताकतीचा आहे. सारे कथानक माझ्या व्यक्तिरेखेभोवती फिरणारे असून माझ्या भूमिकेला अनेक पदर आहेत. मला कॉमेडी करण्याची संधी या चित्रपटातून मिळाली असून ही भूमिका साकारताना खूप मजा आली.
मी पक्की मुंबईकर आहे आणि लहानपणापासूनच सलमान सर यांचे चित्रपट बघत आले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत स्क्रीन शेयर करणे ही गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत आहे. अशी संधी फार कमी कलाकारांना मिळते आणि आता मी सलमान खानची हिरॉईन म्हणून पडद्यावर येत असल्यामुळे अगदी वरच्या लेव्हलची एक्ससाईटमेन्ट आहे. खरंतर लहानपणी मी खूप अबोल होते आणि शांत असायचे. मला डॉक्टर बनायचे होते. या क्षेत्रात येण्याचा विचार मनात दूरदूरपर्यंत नव्हता. परंतु मला वाटते की देवाने माझ्यासाठी हे क्षेत्र निवडून ठेवले होते. मी ब्युटी पेजन्टमध्ये भाग घेण्याचे निमित्त झाले आणि ती जिंकल्यावर मला या क्षेत्राने निवडले असे मला वाटते.
त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की देवाने मला या क्षेत्रासाठी निवडले असले तरी त्याने नेहमीच माझ्यासमोर चॅलेंजेस उभी केली. पहिल्या हिंदी चित्रपटात मला सुपरस्टार ह्रितिक रोशनच्या समोर ठेवलं. त्यानंतर अल्लू अर्जुन, विजय थलपति, राम चरण, महेश बाबू अशा दिग्गज मंडळींसमोर काम करण्याची संधी दिली. थोडक्यात मला नेहमीच बड्या स्टार्स सोबत काम करावं लागलं. अर्थात मी त्याबद्दल काहीच तक्रार करीत नाहीये परंतु हे दिग्गज समोर असताना मला नेहमीच डबल मेहनतीने काम करावे लागले आणि त्याबद्दल मला अभिमान आहे. अशी संधी सर्वांनाच मिळत नाही. आता ‘कभी दिवाली कभी ईद’ म्हणजेच ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये मी सलमान खान बरोबर खांद्याला खांदा लावून उभी आहे. अशी संधीही जास्त लोकांना मिळत नाही. माझ्या फिल्मोग्राफीमध्ये हा सिनेमा मापदंड ठरेल असे मला वाटते.
सलमान खान त्याचे चित्रपट ईदला प्रदर्शित करतो परंतु ‘किसी का भाई किसी की जान’ हा माझाही चित्रपट असून तो ईदला रिलीज होतेय ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून यात रोमान्स आहे, ऍक्शन आहे, उत्तम गाणी आहेत, उत्तर आणि दाक्षिणात्य संस्कृतींचा संगम आहे, उत्तम पिक्चरायझेशन आहे, भली मोठी कास्ट आहे आणि अर्थात सलमान खान आहे. मला या चित्रपटात कॉमेडी करायला मिळाली आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कॉमेडी करणे खूप कठीण काम आहे म्हणूनच म्हटले आहे, ‘कॉमेडी इज अ सिरीयस बिझनेस’. यातील माझी व्यक्तिरेखा एकदम बिनधास्त आहे, वेडेपणा करणारी आहे. खऱ्या आयुष्यात मी एकदम विरुद्ध आहे. मी खूप शांत स्वभावाची आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही भूमिका साकारणे चॅलेंज होते आणि मी ते चांगल्या रीतीने पेललंय असं वाटतंय. अर्थात याआधी मी अक्षय कुमार सोबत काम केलंय आणि अक्षय चं कॉमेडी टाईमिंग कमाल आहे. मी रोहित शेट्टी च्या दिग्दर्शनाखाली रणवीर सिंग सोबत काम केलंय. त्या दोघांची विनोदाची समज आणि पकड अफलातून आहे. या गोष्टींचाही अनावधानाने मला फायदा नक्कीच झाला.