मुंबई - Pippa screening: 'पिप्पा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी 8 नोव्हेंबर रोजी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांचा हा चित्रपट दोन दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. रिलीजच्या आधी, स्क्रिनिंग इव्हेंटमध्ये विद्या बालन, महेश भट्ट, सोनी राजदान, कुणाल खेमू, आणि आदित्य रॉय कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या स्क्रीनिंगमध्ये ईशानची वहिनी मीरा राजपूतदेखील उपस्थित होती. इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये मीरा राजपूत तिचा दीर ईशान खट्टरसोबत पोझ देताना दिसतेय. शाहिद कपूरच्या पत्नीनं आकर्षक फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर ईशान खट्टरनं यावेळी सूट परिधान केला होता. या लूकमध्ये तो मोहक दिसत होता. दुसरीकडे मृणाल ठाकूरनं ब्राऊन गाऊन परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. आदित्य रॉय कपूर फॉर्मल पण क्लासी लूकमध्ये या कार्यक्रमाला आला होता. यासोबतच विद्या बालन काळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. या तिघांनीही कॅमेऱ्यासमोर एकत्र पोझ दिली.
'पिप्पा' चित्रपटाबद्दल :'पिप्पा' चित्रपट 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील हा मोठा क्षण होता. 'पिप्पा'ची निर्मिती आरएसव्हिपी (RSVP) आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या रॉय कपूर फिल्म्सच्या बॅनरखाली झाली आहे. राजा कृष्ण मेनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शित केलंय. एका मुलाखतीदरम्यान, ईशान खट्टरनं 'पिप्पा'च्या शेवटच्या शॉटदरम्यान स्फोट झालेल्याचा खुलासा केला होता. त्यानं सांगितलं होत की, 'मी तुम्हाला पीटी-76 बद्दल एक रंजक गोष्ट सांगतो. 'जेव्हा आम्ही शेवटचा शॉट शूट करत होतो, तेव्हा अचानक टाकीतून काळा धूर येऊ लागला. तरीही आम्ही तो शॉट पूर्ण शूट केला'.