मुंबई- AR Rahman faces backlash : ईशान खट्टरची प्रमुख भूमिका असलेला पिप्पा हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटात एआर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं 'करार ओई लुहो कोपट' हे देशभक्तीपर गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. सोशल मीडियावर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर निर्मात्यांनी माफी मागितली आहे. सोमवारी हाऊस रॉय कपूर फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसनं इन्स्टाग्रामवर निवेदन प्रसिद्ध करत बंगाली कवी नजरुल इस्लाम यांच्या या देशभक्तीपर गाण्याबद्दल मागितली आहे.
प्रॉडक्शन हाऊसनं निवेदनात म्हटलंय की," 'करार ओई लूहो कोपट' या गाण्याच्या भोवती सध्या सुरू असलेल्या चर्चे दरम्यान चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार हे स्पष्ट करु इच्छितात की, दिवंगत कवी काझी नजरुल इस्लाम यांच्याकडील या काव्याचं हक्क मिळवल्यानंतर या गाण्याचं आम्ही केलेलं सादरीकरण हा एक कलात्मक दृष्टीकोनातून केलेला प्रयत्न आहे."
"आम्हाला या गाण्याची मूळ रचना आणि दिवंगत कवी काझी नजरुल इस्लाम यांच्याबद्दल मनापासून आदर आहे. त्यांचं भारतीय उपखंडातील संगीत, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. बांगलादेशच्या मुक्तीसाठी आणि स्वातंत्र्य, शांतता आणि न्यायासाठी संघर्षाच्या भावना लक्षात घेऊन हा अल्बम त्यांचे जीवन समर्पित केलेल्या स्त्री-पुरुषांना श्रद्धांजली म्हणून तयार करण्यात आला आहे, " असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटलंय की, "आम्ही दिवंगत कल्याणी काझी आणि अनिर्बन काझी यांच्याशी संपर्क करुन त्यांच्या परवानगीनं या गाण्याच्या निर्मितीपर्यंत पोहोचलो. करारामध्ये घालण्यात आलेल्या सर्व नियम अटींचं पालन करुनच गाण्याच्या सांस्कृतिक महत्त्वाला अभिवादन करण्याचा आमचा हेतू होता. यामुळे आम्हाला नवीन रचनासह गीत वापरण्याची परवानगी मिळाली. प्रेक्षकांना मूळ रचनेशी असलेली भावनिक जोड आमच्या लक्षात आली आहे. सर्व कला मूळतः व्यक्तिनिष्ठ असली तरी देखील जर आमच्या या रचनेनं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा अनपेक्षित त्रास झाला असेल तर आम्ही मनापासून क्षमा मागतो," असे निवेदनात म्हटले आहे.
एआर रहमान यांनी रिक्रिएट केलेलं 'करार ओई लूहो कोपट' गाणं रिलीज झाल्यानंतर त्याची तुलना मूळ गाण्याशी होऊ लागली. अनेक नेटीझन्सना नवं गाणं आवडलं नाही. त्यामुळे तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळाल्या. अशा प्रतिक्रियांवर एक नजर टाकली की आपल्या लक्षात येईल की नेटिझन्स का प्रतिक्रिया देत आहेत.