मुंबई- शाहरुख खानने पुन्हा एकदा आपण बॉलिवूडचा बादशाह असल्याचे सिध्द केले आहे. चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करताना पठाण चित्रपटाचा दबदबा निर्माण केला आहे. पठाणने त्याची लोकप्रियताच परत मिळवून दिली नाही तर बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत अनेक नवे विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. पठाण 25 जानेवारीला रिलीज झाला होता आणि आता या चित्रपटाने 9 दिवसांत चांगली कमाई केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसरा वीकेंड संपण्यापूर्वीच पठाणने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा आकडा गाठला आहे.
9व्या दिवशी पठाणची कमाई- पहिल्या दिवशी ५५ कोटींचे खाते उघडणाऱ्या पठाण या अॅक्शन चित्रपटाने 9व्या दिवशीही दुहेरी अंकात कमाई करून धमाका केला आहे. या चित्रपटाने 9व्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 15.50 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पठाणची एकूण कमाई 364 कोटींवर गेली आहे. यामुळे 'पठाण'ने पुन्हा एकदा शाहरुखचा आत्मविश्वास उंचावला आहे.
पठाणने 700 कोटींचा टप्पा पार केला - पठाण चित्रपटाकडून ज्या अपेक्षा निर्माता, दिग्दर्शक आणि शाहरुखने बाळगल्या होत्या त्याहून चित्रपटाला अपार लोकप्रियता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पठाणने 9व्या दिवसाच्या कमाईतून जगभरात 700 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने 8व्या दिवशी 667 कोटींची कमाई केली. यावरून पठाणची जादू अजूनही सुरू असल्याचे दिसून येते. दरम्यान, चित्रपटाची तिकिटे 25 टक्क्यांनी स्वस्त करण्यात आली आहेत, ज्यामुळे दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी झेप पाहायला मिळाली.